धुळे : सातारा जिल्ह्यातील सराफा कुरिअरवर दरोडा टाकून पांढऱ्या कारमधून पसार झालेल्या पाच दरोडेखोरांना शिरपूर शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले. २२ तोळे लुटलेले सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून या धाडसी कारवाईची सर्वत्र आहे. यामुळे पोलिसांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक बसविण्याच्या दृष्टीने ही कारवाई केल्याचे अदोरेखित झाले आहे.

यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १२ वाजता सातारा शहरातून मुंबई–पुणे महामार्गावरून सराफा कुरिअरसाठी २२ तोळे सोने घेऊन जात असताना न्यू लक्ष्मी कुरिअर कंपनीचे मालक प्रमोद परमार व कुरिअर बॉय कोमल परिहार यांना पाच अज्ञात व्यक्तींनी अडवून दमदाटी करत दरोडा टाकला. धक्कादायक बाबा म्हणजे घटनास्थळी दरोदेखोर हे काळ्या रंगाच्या अॅक्टिवावरून आले असून त्यांनी सोने हिसकावून पांढऱ्या कारने पलायन केले माहिती मिळाली होती असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी म्हटले आहे.

या घटनेनंतर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून फुटलेल्या काचेसह पांढरी कार धुळ्याकडे येण्याची शक्यता व्यक्त केली. कोणतीही शंका उपस्थित न करता धुळे पोलिसांनी तातडीने नाकाबंदीचे आदेश दिले. शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने महामार्गावर सापळा रचला. दरम्यान, संशयितांनी टोल नाका चुकवून शिरपूर गावातील आतील रस्त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी संशयित स्विफ्ट कारला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वेग वाढवला.

त्यानंतर सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी कार अडवून पाचही आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्याकडील २२ तोळे सोने जप्त केले. अटक करण्यात आलेले आरोपी हे मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथील असून अभिषेक शिकलबार, अंकुश जाट, अनुज दिवाकर, पंकज राठोड व अजय राठोड अशी त्यांची नावे आहेत.

या कारवाईनंतर आरोपींना पुढील तपासासाठी सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अवघ्या काही तासांत जिल्ह्याबाहेरील दरोडेखोर टोळीला गजाआड करत लुटीतील मुद्देमालासह पकडल्याने धुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. विशेष म्हणजे, फुटलेल्या काचेच्या धाग्यावरून संशयित वाहनाचा माग काढत पोलिसांनी अचूक नियोजन आणि समन्वय साधला. या धाडसी आणि तत्पर कारवाईमुळे महामार्गावरील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार असून, पोलिसांच्या सजगतेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.

पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, राजेंद्र रोकडे, रविंद्र आखडमल, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, मनोज महाजन, सचिन वाघ व विजय पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. धुळे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा उघडकीस आला असून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्याच्या दिशेने ठोस पाऊल पडले आहे.