धुळे : पारंपरिक दहीहंडी उत्सवाला सामाजिक संदेशाची जोड देत धुळे शहरातील भगवा चौक येथे यंदा साकारण्यात आलेली ‘अवैध धंद्यांची दहीहंडी’ सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमातून शहरातील कथित अवैध धंद्यांचा मुद्दा ऐरणीवर आणण्यात आला. उत्सवाच्या माध्यमातून प्रशासनाला थेट संदेश देण्याचा प्रयत्न झाल्याने या दहीहंडीची शहरभर चर्चा रंगली.
गेल्या नऊ दिवसांपासून शहर व जिल्ह्यातील कथित अवैध धंद्यांविरोधात आंदोलन केल्यावर ‘अवैध धंदे बंद करू’ अशा शब्दात पोलीस प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर नुकतेच आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र आंदोलकांनी हा विषय सोडलेला नसल्याचे या उपक्रमातून अधोरेखित केले. पारंपरिक दहीहंडीऐवजी ‘अवैध धंद्यांची दहीहंडी’ उभारून ती फोडण्यात आली. हा उपक्रम म्हणजे अवैध धंद्यांविरोधातील संतापाचे प्रतीक असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. या दहीहंडीत बर्वे कन्या छात्रालयाच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दहीहंडीच्या गाण्यांसह आदिवासी गीतांच्या तालावर विद्यार्थिनींनी नृत्य सादर करत वातावरण जल्लोषमय केले. त्यानंतर मानवी मनोरा रचून विद्यार्थिनींनी ‘अवैध धंद्यांची दहीहंडी’ फोडली. उत्सवाचा आनंद आणि सामाजिक जनजागृती यांचा अनोखा संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला.
शहरातील चौक, बाजारपेठा आणि शाळा-महाविद्यालय परिसरात कथित अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करत त्याविरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून त्याचा सामाजिक परिणाम गंभीर असल्याचा मुद्दा आयोजकांनी मांडला. नऊ दिवसांच्या आंदोलनानंतर पोलीस प्रशासनाने कारवाईचे लेखी आश्वासन दिल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात अवैध धंद्यांवर किती प्रभावी कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘अवैध धंद्यांची दहीहंडी’ ही केवळ धार्मिक परंपरा न राहता प्रशासनाला प्रश्न विचारणारा आणि समाजाला जागरूक करणारा उपक्रम ठरल्याची चर्चा शहरात सुरू होती.
यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रद्धा पगार, मनीषा साळवे, अर्चना गोरे आणि सोनल गोरे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला भगवा चौक गणेश मंडळाचे अध्यक्ष पंकज भारस्कर, प्रवीण मुर्तडक, विनोद रणमळे, आप्पा लहामगे, योगेश गोरे, सागर निकम, सागर साळवे, मयूर कुलकर्णी, निलेश चौधरी, गोकुळ येलमामे, स्वप्निल सोनवणे, ज्ञानेश्वर देवरे, दर्शन खंबायत, भावेश आहेरराव, सिद्धार्थ गोरे, जयवंत गोरे, विक्की गर्ग यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज भारस्कर यांनी केले, सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन धनंजय दीक्षित यांनी मानले.
कार्यक्रमादरम्यान आयोजकांनी दहीहंडी हा केवळ धार्मिक उत्सव नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्याचे अधोरेखित केले. उत्सवाच्या माध्यमातून अवैध धंदे, व्यसनाधीनता आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, महिला आणि विद्यार्थिनींच्या सहभागामुळे या संदेशाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले. उपस्थित नागरिकांनीही या अभिनव संकल्पनेचे स्वागत करत, अवैध धंद्यांविरोधातील लढा केवळ आंदोलनापुरता मर्यादित न राहता समाजाच्या सक्रिय सहभागातून पुढे नेण्याची गरज व्यक्त केली. उत्सवाच्या निमित्ताने मनोरंजनाबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा हा उपक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला.
