धुळे: उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा अतिशय महत्त्वाचा असा धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा विविध क्षेत्रांच्या विकासासाठी केंद्रबिंदू असला, तरी या महामार्गवर सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या ‘रिप्लेक्टर’ सारख्या बाबींची युद्ध पातळीवर पूर्तता करण्याची गरज आहे. धुळे – सोलापूर हा दळणवळण मार्ग असून, व्यापार, उद्योग, शेतीमाल वाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी तो जिल्ह्याचा कणा मानला जातो.

या महामार्गामुळे धुळे, मालेगाव, जालना, सोलापूर यांसारख्या जिल्ह्यांचा परस्पर संपर्क सुलभ होतो. मात्र इतका महत्त्वाचा महामार्ग असतानाही रिप्लेक्टर सारखी अत्यावश्यक कामे झालेली दिसत नाहीयेत. परिणामी रात्रीच्या वेळी, वाहनचालकांना मार्गाचा अंदाज येत नाही. या महामार्गांवर काही ठिकाणी कामे सुरु असल्याने लहानमोठ्या अपघातांची शक्यता आहे. विशेषतः अवजड वाहने, मालवाहू ट्रक आणि दुचाकीस्वार यांना याचा मोठा फटका बसू शकतो.

या महामार्गाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत हे काम सुरू आहे. मात्र खर्च झालेला निधी आणि प्रत्यक्षात दिसणारी कामाची गुणवत्ता व गती यामध्ये तफावत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होऊ नयेत यासाठी आवश्यक त्या सर्वच सोयी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे केवळ निधी मंजूर करून चालणार नाही, तर कामाची गुणवत्ता, वेळेत पूर्णता आणि देखभाल यावरही कठोर प्रशासकीय देखरेख आवश्यक असल्याचे म्हटलेजाते आहे.

स्थानिक नागरिक, वाहनचालक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे यासंदर्भात आपल्या भावना मांडून लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले आहेत. अर्धवट राहिलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, महामार्गाच्या दोन्ही बाजूंना रात्री स्पष्ट दिसतील असे रिप्लेक्टर बसवावेत, तसेच पथदिवे व सूचना फलक कार्यान्वित करावेत, अशी मागणी केली आहे. अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी, अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलणे हीच खरी विकासाची कसोटी असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा केवळ रस्ता नसून, तो संपूर्ण परिसराच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीचा आधार आहे. त्यामुळे या महामार्गावरील रखडलेली कामे पूर्ण करून, योग्य देखरेख व जबाबदारी निश्चित केल्यासच नागरिकांचा जीव सुरक्षित राहील आणि विकासाचा खरा उद्देश साध्य होईल. कंत्राटदारांकडून कामात दिरंगाई किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. प्रभावी प्रशासकीय नियंत्रण, पारदर्शक खर्च आणि लोकहित केंद्रस्थानी ठेवूनच धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि उपयुक्त ठरेल, असा सूर सर्व स्तरांतून उमटत आहे.

रिप्लेक्टर म्हणजे काय?

महामार्गाच्या दोन्ही बाजूंना बसवण्यात येणाऱ्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या रिप्लेक्टरला साधारणपणे सोलर रोड स्टड, सोलर कॅट्स आय किंवा सोलर रिफ्लेक्टिव्ह रोड स्टड असे म्हटले जाते. सौर ऊर्जेवर चालणारे रस्ता मार्गदर्शक दिवे किंवा सौर रिफ्लेक्टर (सोलर रोड स्टड) हे उपकरण दिवसा सौर ऊर्जा साठवते आणि रात्री आपोआप प्रकाश देऊन किंवा चमकून रस्त्याची कडा, दुभाजक व वळणे स्पष्टपणे दर्शवते. त्यामुळे रात्रीच्या वेळी, पावसात किंवा धुक्यात वाहनचालकांसाठी हे अत्यंत उपयुक्त आणि अपघात प्रतिबंधक ठरते.