धुळे : सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत जामफळ धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणाली (पीडीएन) मुख्य पाइपलाइन जोडणीच्या कामाचा रविवारी (दि.११) शुभारंभ करण्यात आला. या योजनेमुळे वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तालुक्यातील ५४ गावांतील २६ हजार ९०७ हेक्टर शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ मिळणार असून, जून २०२७ पासून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

जामफळ धरण परिसरात झालेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे, कार्यकारी अभियंता संदीप पवार यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

पालकमंत्री रावल म्हणाले, तापी नदी बारमाही वाहत असूनही शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावे पावसावर अवलंबून राहिली. त्यामुळे कायमस्वरूपी सिंचनाची व्यवस्था उभी करण्यासाठी या प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यात आला. २०१४ नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाला गती मिळाली, तर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या कामांचे भूमिपूजन १० सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले होते. या प्रणालीसाठी एक हजार ५८ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. एकूण ७६६.१६४ किलोमीटर पाइपलाइनपैकी ५४८.८१ किलोमीटर पाइपचा पुरवठा झाला आहे.दरम्यान, ३२४.९३ किलोमीटर पाइपलाइन अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाची एकूण प्रगती ४२.४१ टक्क्यांवर पोहोचली आहे. पाच रेल्वे व तीन राष्ट्रीय महामार्ग क्रॉसिंगपैकी दाबली, मेलाणे आणि माळीच येथील रेल्वे क्रॉसिंगची कामे पूर्ण झाली असून, होळ येथील काम अंतिम टप्प्यात आहे. सुलवाडे-जामफळ मुख्य प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगत रावल यांनी संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्याची प्रतीक्षा न करता शेतकऱ्यांना लवकर सिंचनाचा लाभ मिळावा म्हणून मुख्य पाइपलाइन जोडणी सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट केले. या माध्यमातून सुमारे १ टीएमसी म्हणजे २८.३२ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुरुवातीला सुमारे सहा हजार हेक्टर क्षेत्रात पाणी पोहोचविण्याचे, त्यानंतर १३ ते १४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे.

बंदिस्त पाइपलाइनमुळे पाण्याची गळती आणि अपव्यय कमी होऊन अतिरिक्त २ हजार ७०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच पाच ते सहा गावांनाही या योजनेचा फायदा होणार आहे. लाभक्षेत्राचे सहा झोनमध्ये विभाजन करण्यात आले असून, पाणी व्यवस्थापनासाठी ८९ पाणी वापर संस्था स्थापन केल्या जात आहेत. शाश्वत सिंचनामुळे शेती उत्पादन वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि शिंदखेडा तालुक्यावरील दुष्काळाची ओळख कायमची पुसली जाईल, असा विश्वास पालकमंत्री रावल यांनी व्यक्त केला.