धुळे : रेती वाहतुकीसाठी परवानगी देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्यासह दोन खासगी इसमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी गांधी पुतळा परिसर, धुळे येथे करण्यात आली. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, मोहित बाबासाहेब वारे (३९) हे ग्राम महसूल अधिकारी (सजा कुसुंबा) आहेत.त्यांच्याकडे कौठाळ (ता. धुळे) येथील अतिरिक्त कार्यभार आहे. याशिवाय प्रदीप विश्वास पाटील (रा. कौठाळ, ता. धुळे) आणि स्वप्निल रामकृष्ण देसले (रा. वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे) या दोन खासगी इसमांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तक्रारदार यांचा बांधकाम साहित्य वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे दोन मालवाहू वाहने आहेत. या वाहनांमधून पांझरा नदीपात्रातून रेती वाहतूक करून अमळनेर (जि. जळगाव) येथे रेती नेण्यात येत होती. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी प्रदीप पाटील याने तक्रारदाराची भेट घेऊन आपण तलाठी मोहित वारे यांचे काम पाहतो, असे सांगितले. तक्रारदाराने रेती वाहतूक करायची असल्यास तलाठ्यांशी बोलावे लागेल, अन्यथा वाहनांवर कारवाई केली जाईल, असे सांगून पैशांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी मोहाडी फाटा, कौठाळ येथे प्रदीप पाटील याने तक्रारदारास भेटून तलाठी मोहित वारे यांचा निरोप असल्याचे सांगितले. पांझरा नदी, कौठळ येथून रेती वाहतूक करायची असल्यास प्रत्येक वाहनामागे २५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितल्याचा आरोप आहे. यापूर्वी रेती वाहतूक केल्याबाबत कारवाई करण्याची धमकी देऊन पैसे देण्यास सांगण्यात आले.
याबाबत तक्रारदाराने २८ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात तक्रार दाखल केली. विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी मोहित वारे यांनी २५ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे प्रथमदर्शी निष्पन्न झाले. तसेच खासगी इसम प्रदीप पाटील याने लाच मागणीसाठी मध्यस्थी केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. गांधी पुतळा परिसरात तक्रारदाराकडून तलाठी मोहित वारे यांनी २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर ही रक्कम खासगी इसम स्वप्निल देसले याच्याकडे दिली. देसले याने रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तिघांना रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस हवालदार संदीप हांडगे आणि पोलीस अंमलदार सुरेश चव्हाण यांचा समावेश होता. पर्यवेक्षण स्वप्निल राजपूत, वाचक पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी केले.
या प्रकरणाचा पुढील तपास पद्मावती कलाल, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे करीत आहेत. नागरिकांनी भ्रष्टाचारासंदर्भात माहिती किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरोधात तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
