धुळे : सर्वांगीण व गतिमान विकासाला चालना देण्यासाठी धुळे तालुक्याचा ‘आकांक्षित तालुका’ म्हणून समावेश करण्यात आला असून, यामुळे विशेष निधीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याचा दावा माजी आमदार कुणाल पाटील यांनी केला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण व स्थानिक भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे तालुक्याचा सर्व क्षेत्रांत संतुलित व सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमदार पाटील हे सातत्याने प्रयत्नशील होते. विविध विभागांकडून निधी मिळविणे तसेच शासनाच्या विविध योजना व विकास कार्यक्रमांत धुळे तालुक्याचा समावेश व्हावा यासाठी कुणाल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संबंधित खात्यांच्या मंत्र्यांकडेही त्यांनी वारंवार यासंदर्भात मागणी केली होती. राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रादेशिक संतुलित विकासासाठी ‘आकांक्षित जिल्हा व तालुका कार्यक्रम’ राज्य योजनेंतर्गत विस्तार करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, कामगिरीच्या निकषांवर निती आयोग कडून संबंधित तालुक्यांना विशेष निधी दिला जातो.
धुळे तालुक्याचा समावेश
नुकत्याच जाहीर झालेल्या आकांक्षित तालुक्यांच्या यादीत धुळे तालुक्याचा समावेश झाल्याने विविध विकास योजनांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत रस्ते, वीज, पाणीपुरवठा, शाळा, आरोग्य केंद्र यांसारख्या पायाभूत सुविधांचा वेगाने विकास करता येणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी सिंचन प्रकल्प, ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’, शेततळे यांसारख्या योजनांद्वारे शेतीक्षेत्राला बळकटी मिळणार आहे. रोजगारनिर्मिती, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा आणि ग्रामीण भागाचा विकास यांसाठीही विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार कुणाल पाटील यांनी आभार मानले.
आकांक्षित तालुका म्हणजे नेमकं काय?
‘आकांक्षित तालुका’ हा असा विकासात्मक उपक्रम आहे, ज्यामध्ये सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागे राहिलेल्या किंवा विकासाच्या काही निर्देशांकांमध्ये कमी कामगिरी असलेल्या तालुक्यांची निवड केली जाते. या तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा समन्वय साधून विशेष लक्ष दिले जाते. शिक्षण, आरोग्य, शेती, पायाभूत सुविधा, पोषण आणि रोजगार या प्रमुख क्षेत्रांमध्ये ठोस सुधारणा करण्यावर भर दिला जातो. या कार्यक्रमात कामगिरीच्या आधारे निधी व प्रोत्साहन दिले जाते, त्यामुळे प्रशासन अधिक जबाबदारीने आणि परिणामकारकपणे काम करून त्या तालुक्याचा वेगवान विकास घडवून आणतो अशी माहिती सूत्रांनी दिली.
