धुळे : मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वर्षी फाट्याजवळ धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी तापीची मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जलवाहिनी फुटताच महामार्गावर तब्बल २५ ते ३० फूट उंचीचे पाण्याचे फवारे उडू लागले आणि हजारो लिटर शुद्धीकरण केलेले पिण्याचे पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहून गेले.
बाभळे (ता. शिंदखेडा) येथील जलशुद्धीकरण केंद्रातून धुळे शहराला तापीच्या जलवाहिनीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. हीच मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे उंच फवारे उडू लागल्याने तेवढा भाग अक्षरशः झाकोळला गेला.यामुळे महामार्गावरील वाहतूकही संथ झाली. महामार्गाच्या काठावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. महामार्ग पाण्याच्या फवाऱ्यामुळे धूसर दिसू लागल्याने अनेकदा अपघाताचीही शक्यता निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने काहीही घडले नाही.
शहरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई अलीकडे जाणवत नसली तरी अशा तांत्रिक त्रुटीमुळे वाया जाणारे पाणी टंचाई काळात आरोप- प्रत्यारोप यासाठी कारणीभूत ठरते. विशेष म्हणजे, शहरातील काही गल्लीबोळात नागरिकांना आजही कमी दाबाने किंवा ठरावीक वेळेत पाणीपुरवठा केला जात असताना, अशा प्रकारे शुद्ध पिण्याचे पाणी वाया जाणे ही गंभीर बाब मानली जात आहे. उन्हाळ्याचे दिवस जवळ येत असताना पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो. मात्र, जलवाहिन्यांच्या वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले जात असल्याचे चित्र आहे अशा संतप्त प्रतिक्रिया आज उमटल्या.
दरवर्षी तापीच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. तरीही ही जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने दुरुस्तीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी आणि मजबूत दुरुस्ती का केली जात नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. जुनी आणि गंजलेली जलवाहिनी, वाढलेला पाण्याचा दाब किंवा देखभालीकडे झालेले दुर्लक्ष यामुळेच अशा घटना घडत असल्याचा आरोप होत आहे.
या घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाणीपुरवठा बंद केला व दुरुस्तीचे काम हाती घेतले अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या जलवाहिनी फुटीमुळे धुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, या जलवाहिनी फुटीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून पाणीपुरवठा व्यवस्थेतील निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अशा प्रकारे हजारो लिटर शुद्ध पाणी महामार्गावर वाया जाणे हे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. जलवाहिन्यांची अवस्था, दुरुस्तीचे काम कोणत्या दर्जाचे होते आणि याची जबाबदारी नेमकी कोणाची, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यानिमित्त चर्चेत आली आहे.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संपूर्ण जलवाहिनीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून जुन्या व धोकादायक पाइपलाईन बदलण्यात याव्यात, अन्यथा पाण्याचा अपव्यय रोखणे केवळ घोषणांपुरतेच मर्यादित राहील, असेही यावेळी जाणकारांनी म्हटले.
पाणी बचतीचे आवाहन सातत्याने नागरिकांना केले जात असताना, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या अशा घटनांमुळे पाणी बचतीच्या संकल्पनेलाच तडा जात असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. जलवाहिन्यांची नियमित तपासणी, दर्जेदार दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजना तातडीने राबवण्यात याव्यात, अन्यथा दरवर्षी असेच लाखो लिटर पाणी वाया जाण्याचे प्रकार सुरूच राहतील, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे.

