धुळे : तापी नदीवरील सावळदे पूल आणि गिधाडे येथील पूल हे गेल्या काही वर्षांपासून आत्महत्यांच्या वाढत्या घटनांमुळे ‘सुसाईड पॉईंट’ बनल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या दोन्ही ठिकाणी आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात आणि शासनाने या पुलांना अधिकृतपणे ‘सुसाईड पॉईंट’ घोषित करून विशेष सुरक्षा व्यवस्था करावी, या प्रमुख मागणीसाठी धुळे जिल्हा जागरण मंचाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

धुळे जिल्हा जागरण मंचाच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. सरोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत असून, प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तापी नदीवरील सावळदे येथील पूल राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारित येतो, तर गिधाडे येथील पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी आत्महत्यांच्या घटना वारंवार घडत असतानाही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

डॉ. सरोज पाटील म्हणाल्या, सावळदे आणि गिधाडे येथील पूल गेल्या काही वर्षांपासून आत्महत्यांचे केंद्र बनले आहेत. अनेक कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले असून, या घटना रोखण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करूनही अद्याप परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. या दोन्ही पुलांवर हायमास्ट दिवे बसविणे, चोवीस तास सुरक्षा रक्षक तैनात करणे, संरक्षक लोखंडी जाळ्या उभारणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, आत्महत्या करण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी सुरक्षा बोट उपलब्ध करून देणे तसेच आपत्कालीन मदत यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी जागरण मंचाने केली आहे.

‘सुसाईड पॉईंट’ म्हणून या ठिकाणांची अधिकृत नोंद करून विशेष देखरेख व्यवस्था निर्माण करावी. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम सुरू होणे गरजेचे आहे. मानवतेच्या नात्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी शासन आणि प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. जोपर्यंत सावळदे व गिधाडे पुलांवर कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील, असा निर्धार धुळे जिल्हा जागरण मंचाने व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे आत्महत्यांसारख्या संवेदनशील विषयाकडे प्रशासनाचे आणि नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून, पुढील निर्णयाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, आत्महत्येसारख्या गंभीर घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी केवळ घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा त्या होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. पुलांच्या परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था, समुपदेशन केंद्राशी संपर्क साधण्यासाठी माहिती फलक आणि तातडीच्या मदतीसाठी हेल्पलाइन व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास अनेकांचे जीव वाचू शकतात. दरम्यान, सावळदे व गिधाडे पुलांबाबत प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजनांचा आराखडा तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे. या प्रश्नावर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा धुळे जिल्हा जागरण मंचाने दिला आहे.