धुळे: धुळे ते चाळीसगाव मेमू लोकल रेल्वे सेवा पुढे मनमाडमार्गे नाशिकपर्यंत सुरू करण्याच्या मागणीच्या अनुषंगाने, अतिरिक्त रेल्वे गाड्या चालविण्याचा सल्ला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते जयेश बाफना यांना लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे.
धुळे ते चाळीसगाव मेमू लोकल सेवा पुढे मनमाडमार्गे नाशिकपर्यंत वाढविण्याची मुख्य मागणी जयेश बाफना यांनी रेल्वे मंत्रालयाकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र नाशिक येथे टर्मिनल सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण देत तसेच रेल्वे सेवा वाढविणे हा धोरणात्मक निर्णय असल्याचे स्पष्ट करत रेल्वे विभागाने या पाठपुराव्याला सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद दिला नव्हता. मागणीचा विचार करताना प्रत्यक्ष प्रवाशांना होणारी गैरसोय, वाढती सार्वजनिक मागणी, पर्यायी उपाययोजना तसेच व्यापक सार्वजनिक हित या बाबींचा सखोल विचार रेल्वे विभागाकडून करण्यात आलेला नसल्याचे बाफना यांनी सांगितले.
धुळे, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक या मार्गावर दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. मात्र स्वस्त, सुरक्षित आणि नियमित रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना प्रामुख्याने रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या सुरू असलेल्या धुळे–नाशिक महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामुळे रस्ते प्रवास अत्यंत कठीण झाला आहे. वळणमार्ग, वाहतूक कोंडी, धूळ, वेळेचा अपव्यय आणि अपघातांचा धोका यामुळे विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर धुळे–चाळीसगाव –मनमाड–नाशिक मेमू रेल्वे सेवा सुरू झाल्यास महामार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, अपघातांचे प्रमाण घटेल, प्रवाशांचा वेळ व पैसा वाचेल तसेच सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल, असे बाफना यांनी नमूद केले आहे. तसेच २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही रेल्वे सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर भारतातून येणारे भाविक धुळेपर्यंत रस्तेमार्गे येऊन त्यानंतर धुळे ते नाशिक रेल्वेमार्गे प्रवास करू शकतील. त्यामुळे धुळे–नाशिक महामार्गावरील प्रचंड वाहतूक टाळता येईल, असेही त्यांनी सुचविले. यापूर्वी प्रयागराज येथे कुंभमेळ्यादरम्यान निर्माण झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीसारखी परिस्थिती नाशिकमध्ये टाळण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरू शकते. नाशिक रोड स्थानकावर आधीच काही प्रवासी गाड्या कधी सुरू तर कधी बंद होत असल्याने, तेथे सेवा वाढविण्यासाठी काही कार्यपद्धती अवलंबता येऊ शकतात, असेही बाफना यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
देशातील अनेक भागांत किरकोळ तांत्रिक बदल किंवा तात्पुरत्या व्यवस्थेद्वारे मेमू सेवा चालविण्यात येत असल्याची उदाहरणेही त्यांनी दिली आहेत. मात्र या मागणीसंदर्भात यापूर्वी दिलेल्या उत्तरामध्ये नेमकी कोणती अडचण आहे, याचा सविस्तर खुलासा रेल्वे विभागाकडून करण्यात आलेला नाही, असे बाफना यांचे म्हणणे आहे. प्रवासी सुरक्षा, प्रादेशिक दळणवळण सुधारणा आणि कुंभमेळा नियोजन या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून रेल्वे प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने २२ डिसेंबर २०२५ रोजी या तक्रारीवर कारवाई करून प्रकरण बंद केल्याचे जयेश बाफना यांना कळविले आहे. मात्र नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या प्रस्तावित नियोजनाच्या टप्प्यात अतिरिक्त रेल्वे गाड्या चालविण्याचा सल्ला देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाच्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नियमित मेमू सेवा वाढीचा निर्णय अद्याप प्रलंबित असला तरी कुंभमेळ्याच्या काळात रेल्वे सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील पाठपुरावा नागरिक, प्रवासी संघटना तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सुरू राहणार असल्याचे संकेत या घडामोडीतून मिळत आहेत.
“धुळे–चाळीसगाव मेमू रेल्वे सेवा नाशिकपर्यंत वाढविण्यासाठी मी सातत्याने मागणी व पाठपुरावा करत आहे. आधी विभागाने ‘नाशिक स्टेशनवर टर्मिनल सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे सेवा वाढवणे धोरणात्मक निर्णय आहे’ असे कारण देऊन ही मागणी नाकारली होती. मात्र सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर, नाशिक कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त गाड्या चालविण्याचा सल्ला देण्यात आला आहे; त्यासाठी मी रेल्वे बोर्डाचे आभार मानतो. कुंभमेळ्यापूर्वी ट्रायल मेमू सेवा सुरू केल्यास महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवाशांचा वेळ व पैसा वाचेल, आणि सुरक्षित, वेगवान प्रवास हा प्रत्येक प्रवाशाचा हक्क आहे!” – जयेश बाफना, (सामाजिक कार्यकर्ते, धुळे)
