धुळे : अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराण विरोधात संयुक्त मोहीम हाती घेऊन त्या देशावर जोरदार हल्ले केले आणि अवघे जग हादरले. इराकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीचा त्या- त्या भागातील विमानसेवेवर परिणाम होत असून, कंपनीच्या सहलीसाठी दुबईला गेलेले धुळ्यातील काही तरुण सध्या दुबईतच अडकले आहेत.

दुबईत अडकलेल्या पर्यटकांचे परतीचे विमान तीन तारखेला नियोजित होते. वाढत्या तणावामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली किंवा त्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. यामुळे या पर्यटकांच्या धुळ्यातील कुटुंबियांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणांचे वेळापत्रक सातत्याने बदलत असून काही मार्गांवरील सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी अनेक प्रवाशांना हॉटेलमध्येच थांबावे लागत आहे. धुळ्याच्या या गटानेही खबरदारीचा उपाय म्हणून हॉटेलमध्ये मुक्काम ठेवला आहे.

स्थानिक प्रशासन तसेच सहल आयोजक कंपनीकडून या अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक मार्गदर्शन मिळत असल्याचे म्हटले जाते आहे.या युद्धस्थितीच्या तणावामुळे हवाई क्षेत्रात निर्बंध लागू करण्यात आले असून अनेक उड्डाणे रद्द किंवा विलंबित होत आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांमध्ये काही प्रमाणात चिंतेचे वातावरण आहे. तथापि, धुळ्यातील एक पर्यटक मोंटी पाटील यांनी यांनी त्यांच्या सोबत दुबईवारी करण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या धुळ्यातील कुटुंबीयांना धीर देत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, धुळ्यातील त्यांच्या कुटुंबीयांशी सातत्याने संपर्क सुरू असल्याचे समजते.यामुळे सर्वजण सुरक्षित आहेत, हीच मोठी दिलासादायक बाब असल्याची भावना व्यक्त होते आहे. युद्धसदृश आणि भीतीदायक पार्श्वभूमी असली तरी दुबईतील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे तेथून मिळालेल्या माहितीतून स्पष्ट होत आहे. उड्डाण सेवा पूर्ववत झाल्यानंतर हे पर्यटक लवकरच धुळ्यात परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भारत सरकारकडून मध्यपूर्वेतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार भारतीय दूतावासामार्फत मदत उपलब्ध करून दिली जात असल्याचे समजते. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने तेथील भारतीय नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि आपत्कालीन क्रमांकांशी संपर्कात राहावे, असे आवाहन केले आहे.

धुळ्यातील तरुणांनीही दूतावासाच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्याचे म्हटलेजते आहे. स्थानिक स्तरावर या घटनेची चर्चा सुरू असून सुरुवातीला कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र मोंटी पाटील यांनी पाठविलेल्या व्हिडिओ संदेशानंतर अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. “परिस्थिती गंभीर असली तरी आम्ही सुरक्षित आहोत आणि योग्य वेळी परत येऊ,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवीन उड्डाण वेळापत्रक जाहीर होताच परतीचा प्रवास निश्चित केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.