धुळे : साखरपुड्याच्या कार्यक्रमात झालेल्या वादातून तिघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना पिंपळनेर परिसरातील घोडेमाळ (ता. साक्री) येथे घडली. एकाच समाजातील भाऊबंदांमध्ये जुना वाद उफाळून आल्याने मंडपातच मारामारी झाली आणि त्यात तिघांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शांतता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज ( दि. १९) दुपारी पिंपळनेर शिवारात असलेल्या घोड्यामाळ (ता. साक्री) येथे विजू गोसावी यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता.तत्पूर्वी साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना दोन गटांत वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. या मारामारीत सुरेश गोसावी  (५०), साहिल गोसावी (३५) आणि देवेंद्र पवार (३६) यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली.

आरोपी घाटात सापडले

घटनेनंतर संशयित आरोपी ब्रेझा कारमधून गुजरातच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पिंपळनेर पोलिसांनी तत्काळ हालचाली करून घाट परिसरात स्थानिक नागरिकांना वाहन क्रमांकाची माहिती दिली आणि ओटाबारी या गुजरात सीमेवरील घाटात वाहतूक कोंडी निर्माण करून संबंधित वाहन अडवण्यात आले. यावेळी तिघांना ताब्यात घेण्यात आले.

कांतीलाल गोसावी (४२), जसवंत गोसावी (३६) तसेच एक चालक अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते तिघेही सोनगड (गुजरात) येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. सर्व आरोपींना पुढील चौकशीसाठी पोलिस ताब्यात ठेवण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, वादाचे कारण जुने कौटुंबिक व आर्थिक मतभेद असल्याची शक्यता म्हटली जात आहे. साखरपुडा सारख्या आनंदाच्या प्रसंगी अचानक झालेल्या या घटनेमुळे उपस्थित पाहुण्यांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही जणांनी जीव वाचवण्यासाठी परिसर सोडला, तर काहींनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

चिथावणीखोर स्टेटस…

मोबाईलवर चिथावणीखोर स्टेटस ठेवल्याचा जाब विचारल्याने गुजरात राज्यातील सोनगड येथील वर्‍हाडी मंडळींकडून पिंपळनेरच्या वधू मंडळीकडील लोकांवर चाकूने सपासप वार केले असे समजते. या चाकू हल्ल्यात वधू मंडळीकडील तीन जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने पिंपळनेर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची सखोल चौकशी

दरम्यान, पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून प्रत्यक्षदर्शींची जबाब नोंदविण्याची तयारी झाली आहे. घटनास्थळावरील पुरावे संकलित करणे आणि आरोपींविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदविण्याचीही प्रक्रिया सुरू आहे. पुढील काही दिवस पोलिसांकडून चौकशीचा वेग वाढविण्यात येणार असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी पोलिस प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनेमागील नेमकी कारणमीमांसा तपासातून स्पष्ट होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.