धुळे : महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करणाऱ्या आयसर ट्रकवर शिरपूर तालुका पोलिसांनी कारवाई करत सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी हरियाणा येथील ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून, प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादन, पुरवठा व वाहतुकीत सहभागी असलेल्या संबंधित कंपनीच्या मालक-संचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई गुरुवारी (२९ ऑक्टोबर) दुपारी साडेएकच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील तपाराणी नाका, हाडाखेड येथे करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आयसर कंपनीच्या एचआर-५५ एएस-३४५७ क्रमांकाच्या वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूची वाहतूक सुरू होती. पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता, १२ लाख रुपये किमतीची ‘हंस’ छाप तंबाखूची १० हजार पाकिटे (प्रति पाकीट १२० रुपये) आढळून आली. तसेच सुमारे १० लाख रुपये किमतीचे आयसर वाहन असा एकूण २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन, धुळे येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत भारत राणे (३७) यांनी तक्रार दिली. त्यानुसार चालक इरफान समसुद्दीन (४१, रा. घरोट, ता. हातीन, जि. पलवल, हरियाणा) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासह संबंधित उत्पादन कंपन्यांचे मालक व संचालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने अधिसूचना क्रमांक ८६६/२०२६, दि. १३ जुलै २०२६ अन्वये या अन्नपदार्थांवर बंदी घातलेली असतानाही त्यांची वाहतूक केल्याचा आरोप आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आनंद व अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरणार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
संयुक्त कारवाईला बळ
प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची राज्यात होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे तपासाची व्याप्ती वाढविली आहे. जप्त करण्यात आलेला माल नेमका कुठून आणण्यात आला होता, तो कोणाकडे पोहोचविण्यात येणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. तसेच जप्त तंबाखूचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्रीवर बंदी असतानाही अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे अशा अवैध साखळीचा पर्दाफाश करण्यासाठी संबंधित उत्पादन कंपन्या, पुरवठादार आणि वितरकांची चौकशी करण्यात येणार असून, तपासात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
