धुळे : धुळे शहरातील जुना नागपूर–सुरत महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर परिसरातील मोती नाल्यावरील नव्या समांतर पुलाच्या बांधकामाचा मोठा भाग बुधवारी (दि. ४) दुपारी अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने घटना घडली त्यावेळी बांधकामाखाली कोणताही कामगार नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, काही क्षणांचा विलंब झाला असता तर भीषण दुर्घटना घडली असती, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

मोती नाल्यावरील विद्यमान पूल अरुंद पडत असल्याने आणि वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन जुन्या पुलालगत समांतर पूल उभारण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. या कामासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जात असून, नाल्यातील पाणी विद्युत पंपांच्या साहाय्याने उपसून पायाभरणी, लोखंडी सळई बांधणी आणि सिमेंट-काँक्रीटचे ओतीव काम युद्धपातळीवर सुरू होते. मंगळवारी दिवसभराचे काम पूर्ण झाल्यानंतर यंत्रसामग्री हटविण्यात आली होती. बुधवारी सकाळी पुन्हा काम सुरू असताना काही कामगारांच्या लक्षात बांधकामाचा भाग हलत असल्याचे आले. त्यांनी तातडीने आरडाओरड करून इतरांना दूर जाण्यास सांगितले. काही क्षणांतच ओतीव काँक्रीटचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने त्या ठिकाणी कोणीही नसल्याने अनर्थ टळला.

गुजरातकडे जाणारा महत्वाचा मार्ग

जुना नागपूर–सुरत महामार्ग हा धुळे शहरातून साक्री, नवापूर तसेच गुजरातकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. शहराच्या विस्तारानंतर या मार्गावरील वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला असून, मोती नाल्यावरील अरुंद पूल वारंवार कोंडीचे कारण ठरत आहे. सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणे, किरकोळ अपघात आणि वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना येथे नेहमीच घडत असतात. त्यामुळे पुलाच्या रुंदीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या पार्श्वभूमीवर या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे.

कामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह…

दरम्यान, पुलाच्या बांधकामाचा भाग कोसळल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेनंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करण्यात आली असून, कोसळण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक तपास सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे पुलाच्या कामाच्या सुरक्षिततेची नव्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पुलाच्या बांधकामाचा भाग कोसळल्यानंतर काही काळ परिसरातील काम पूर्णपणे थांबविण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित भागाची पाहणी करून धोकादायक अवशेष हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. या घटनेमुळे आधीच वाहतुकीच्या कोंडीने त्रस्त असलेल्या या मार्गावरील वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बांधकामाच्या गुणवत्तेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, तसेच पुढील काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक तांत्रिक तपासणी करून सुरक्षिततेची खात्री करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.