लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणांनी बुधवारी धुळे शहरात “जय शिवाजी-जय भारत” पदयात्रा जल्लोषात काढण्यात आली.

धुळे जिल्हा प्रशासन, धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी, धुळे जिल्हा नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गरुड मैदानापासून जय शिवाजी-जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील आदी उपस्थित होते.

खासदार डॉ. बच्छाव यांनी, शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करावेत, असे आवाहन केले. आमदार अग्रवाल यांनी शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी पापळकर यांनी पदयात्रा आयोजनाचा मूळ उद्देश मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण देशात अतिशय महत्वाचे स्थान आहे. त्यांच्या योगदानाचे सर्व नागरिकांनी स्मरण करुन त्यांच्या विचारांचा ठेवा बरोबर ठेवावा, असे सांगितले. यावेळी धुळे युथ क्लब आणि धुळे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियानातंर्गत किल्लेदार स्पर्धा, मातीचे किल्ले स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. धुळे वनविभागाच्यावतीने ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत खासदार डॉ. बच्छाव, आमदार अग्रवाल तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

जय शिवाजी-जय भारत पदयात्रा क्युमाईन क्लब – जेल रोड – तहसील कार्यालय- राजवाडे बँक- झाशी राणीपुतळा- जुनी महानगरपालिका- पारोळा रोडमार्गे प्रकाश टॉकीजजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यात्रेचा समारोप झाला.

पदयात्रेत कमलाबाई कन्या हायस्कुल, कनोसा हायस्कुल, न्यु सिटी हायस्कुल, महाराणा प्रताप विद्यालय, चितळे विद्यालय, जो.रा. सिटी हायस्कुल, राष्ट्रीय सेवा योजना तसेच सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Story img Loader