वारीतील संत निवृत्तीनाथांच्या रथाला दररोज वेगळी पुष्प सजावट ; दररोज २० हजार रुपयांचा खर्च

ही सजावट नाशिक जिल्ह्यातील भक्त मंडळींकडून केली जात असून दररोज वेगवेगळय़ा प्रकारची पुष्प सजावट हे या पालखी सोहळय़ाचे वैशिष्टय़े झाले आहे.

(त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत निवृत्तीनाथ पालखी सोहळय़ातील रथाला दररोज पुष्प सजावट करणारी मंडळी (छाया- राजेंद्र भांड))

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा हजारो वारकऱ्यांच्या साथीने वाटचाल करत असून या वारीतील संत निवृत्तीनाथांच्या चांदीच्या रथाला दररोज नवनवीन प्रकारची फुले, हार, तुरे तसेच इतर वस्तू वापरून आकर्षक सजावट केली जात आहे. ही सजावट नाशिक जिल्ह्यातील भक्त मंडळींकडून केली जात असून दररोज वेगवेगळय़ा प्रकारची पुष्प सजावट हे या पालखी सोहळय़ाचे वैशिष्टय़े झाले आहे.


त्र्यंबकेश्वर, नाशिक, सिन्नर, राहुरी, श्रीरामपूर, अहमदनगर, घोगरगाव, कोरेगाव, कर्जत दूर सारत पालखी सोहळय़ाने आता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. आतापर्यंत ४०० किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास झाला आहे. आषाढी एकादशीच्या सोहळय़ासाठी नऊ जुलै रोजी पालखी पंढरीत पोहोचणार आहे. दोन वर्षे करोनामुळे पायी वारी बंद होती. त्यामुळे यंदाच्या वारीत वारकऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. नाशिक तालुक्यातील माडसांगवी येथील दिवंगत शिवाजी महाराज पेखळे यांच्या संकल्पनेतून ही रथ सजावट परंपरा सुरू झाली. या सजावटीसाठी साधारण २० ते २५ हजार रुपये खर्च येतो. साधारण एक महिना रथ वारी पंढरपूपर्यंत चालत जाते. दररोज निरनिराळय़ा पद्धतीने नैसर्गिक फुलांच्या माध्यमातून रथाला होणारी सजावट डोळय़ांचे पारणे फेडणारी असते. शिवाजी महाराज पेखळे यांच्या निधनानंतर वारीची परंपरा त्यांचे पुत्र दशरथ पेखळे सांभाळत असून रथ सजावटीसाठी अनेकांचे योगदान लाभत आहे. सुभाष काठे आणि मित्र परिवार रथ सजावट ग्रुप माडसांगवी, वरवंडी ग्रामस्थ, नाशिक फुल बाजार मित्र मंडळ, वैभव पतसंस्था पळसे, संत निवृत्तीनाथ महाराज पतसंस्था चिखली, हरी भक्त परिवार, जय बाबाजी परिवार, शिवशंभु प्रतिष्ठान आडगाव , वारकरी मंडळ शेवगेदारणा, कर्जत ग्रामस्थ, जय बाबाजी मित्र मंडळ मांडसांगवी, समस्त ग्रामस्थ उंबरखेड ,शिवनेरी मित्र मंडळ कंदर, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ भजनी मंडळ त्र्यंबकेश्वर, श्रीकृष्ण मित्र मंडळ बाभळेश्वर, पिंपळनारे ग्रामस्थ आदींसह असंख्य सांप्रदायिक मंडळी सहभागी होउन रथ सजावटीच्या माध्यमातून सोहळय़ाचा आनंद घेतात.


याशिवाय मांगल्याचे प्रतीक समजली जाणारी रांगोळी पालखी सोहळय़ात काढली जाते. राजेंद्र जुन्नरे (आळंदी) हे नाथांच्या पालखी सोहळय़ात अनेक वर्षांपासून सुंदर रांगोळी काढत आहेत. रोज किमान २५ किलो रांगोळी त्यांना लागते. ते रांगोळीतून सामाजिक संदेश देखील देतात, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख पुंडलिक थेटे यांनी दिली.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Different floral decorations for saint nivruttinath wari every day amy

Next Story
पुलाच्या संथ कामामुळे ग्रामस्थांना त्रास ; १० किलोमीटरचा वाढीव फेरा पार करण्याचे संकट
फोटो गॅलरी