नाशिक – कॉलनीतील सिमेंट रस्त्याच्या मधोमध असलेली खोल जुनी विहीर. पलीकडे काही अंतर सोडून पुढे पुन्हा रस्ता. एका बाजूचा रस्ता अगदी विहिरीपर्यंत भिडलेला. विहिरीचा एक फूटपेक्षा कमी उंचीचा कठडाही सिमेंटचाच. रस्ता आणि कठड्याच्या उंचीत फारसा फरक नाही. या ठिकाणी धोकादायक स्थितीचा माहिती फलक देखील नाही. सिमेंटचा रस्ता थेट विहिरीपर्यंत भिडत असल्याने रात्री कुणाला समोरील धोक्याचा अंदाज देखील येणार नाही. ही बाब शुक्रवारी रात्री दिंडोरीतील भीषण अपघाताचे कारण ठरले.

दिंडोरी येथील शिवाजीनगर भागात मोटार विहिरीत पडून एकाच कुटुंबातील सहा शालेय विद्यार्थ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. शिवाजीनगर हा निवासी वसाहतीचा परिसर असून याच ठिकाणी राजे बॅक्वेट हॉल व मंगल कार्यालय आहे. या कार्यालयात ये-जा करण्यासाठी दोन प्रवेशद्वार असून यातील पुढील प्रवेशद्वाराने थेट बाहेर निघून जाता येते. कॉलनी रस्त्यातील धोकादायक विहीर लागत नाही.

कार्यक्रमास आलेली वाहने त्याच प्रवेशद्वारातून बाहेर पडल्याचे सांगितले जाते. सुनील दरगोडे हे कार्यालयाच्या मागील दरवाजाने मोटार घेऊन निघाले आणि भरधाव वेगात त्यांचे वाहन कॉलनी रस्त्यातील विहिरीत कोसळले. रात्री दहा ते साडेदहा वाजता ही घटना घडली.

शिवाजीनगरमधील हा रस्ता साधारणत सात वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. विहिरमालक राजेंद्र राजे आणि नगर परिषदेत रस्त्यासाठी जागा देण्यावरून काही वाद होते. त्यामुळे विहिरीपासून वळण घेऊन पुढील रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यासाठी जागा मिळाली नसल्याचे स्थानिक सांगतात. या स्थितीत कमी उंचीच्या विहिरीच्या कथड्याला संरक्षक व्यवस्था करण्याचा विचार ना नगर परिषदेने केला, ना विहिर मालकाने. त्यातही अगदी विहिरीपर्यंत रस्त्याची झालेली बांधणी अपघातांना निमंत्रण देणारी ठरली.

कारण सिमेंट रस्त्याची उंची आणि विहिरीचा कथडा यांच्या उंचीत फारसा फरक नाही. रस्ता सरळ विहिरीपर्यंत जात असल्याने आणि विहिरीच्या पलिकडे रस्ता दिसत असल्याने वाहनधारकाला या धोकादायक विहिरीचा अंदाज आला नसल्याचा निष्कर्ष स्थानिकांकडून काढला जातो.

रस्त्यातील विहिरीमुळे जिवितहानी अथवा अपघात होऊ शकतो हे माहिती असतानाही सुरक्षितेतच्या दृष्टीने विहिरीला संरक्षक जाळी अथवा अधिक उंचीचे कथडे न केल्या प्रकरणी पोलिसांनी विहिरमालक राजेंद्र राजे यांच्याविरोधात सदोष मनुुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. जेव्हा हा रस्ता बांधला तेव्हा तत्कालीन अधिकारी व ठेकेदाराने रस्ता थेट विहिरीपर्यंत कसा नेला, त्यांच्यावरही कारवाई होणार की नाही, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जातो. कारण, कॉलनी रस्ता १० ते १५ फूट आधीच खंडित केला असता तर किमान वाहनाचा वेग कमी झाला असता. चालकाला विहिरीचा अंदाज आला असता. परंतु, तसे काही झाले नाही.

जिल्ह्यात आता सर्वत्र खबरदारी…

अपघातानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनीही विहिरीच्या कथड्याची उंची कमी असल्याचे नमूद केले. प्राथमिक माहितीनुसार नगर नियोजन योजना २००७ मध्ये मंजूर झाली होती. ले आऊट कसा मंजूर करण्यात आला. विहिर सुरक्षेच्या उपाय योजनांनी बंदिस्त का केली गेली नाही, याचा संपूर्ण इतिहास अर्थात माहिती देण्याचे निर्देश दिंडोरी नगरपंचायतीला देण्यात आले आहेत.

चौकशीत कुणीही दोषी आढळले तरी कठोर कारवाई केली जाईल. नाशिक जिल्ह्यात रस्त्यालगतच्या विहिरीच्या ठिकाणी कुठेही अशी दुदैवी घटना घडू नये म्हणून खबरदारी घेतली जाईल. तिथे आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी म्हटले आहे.