नाशिक – दिंडोरीतील शिवाजीनगर भागात रात्री मोटार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील सहा चिमुकल्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे संतप्त पडसाद उमटले. शनिवारी घटनास्थळी आलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांना स्थानिकांसह मृतांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

रस्त्याच्या मध्यभागी असणारी ही धोकादायक विहीर सुरक्षित करण्यासाठी दिंडोरी नगरपंचायत आणि जागामालकाने दुर्लक्ष केले. विहिरीच्या कठड्यापर्यंत रस्ता बांधलेला आहे. आमदारांनी या भागात सौर दिवे लावून स्वतःच्या नावाचे फलक लावले, मात्र विहीर सुरक्षित करण्याकडे डोळेझाक केल्याचाही संताप व्यक्त झाला.

​दिंडोरी शहरातील शिवाजीनगर निवासी भागात कॉलनी रस्त्याच्या मध्यभागी विस्तीर्ण आकाराची ही धोकादायक विहीर आहे. ती सुमारे ६० फूट खोल आहे. सिमेंटचा कॉलनी रस्ता या विहिरीच्या कठड्यापर्यंत जातो. विहिरीचा सिमेंट कठडा एक फूट उंचीचाही नाही. रात्री चालकाला अंदाज आला नाही आणि मोटार थेट विहिरीत कोसळली.

यापूर्वी पाळीव जनावरे विहिरीत पडण्याच्या घटना घडल्या आहेत. या धोकादायक विहिरीला संरक्षक भिंत उभारून जाळी बसविण्याची मागणी स्थानिकांनी सातत्याने केली होती. ज्यांच्या जागेत ही विहीर आहे, त्या राजेंद्र राजे यांचे घर जवळच आहे. घरागत वाहने व अन्य कारणांसाठी संरक्षक भिंत व दरवाजे बसविण्यात आले, परंतु मोकळ्या जागेतील विहीर कोणतीही उपाययोजना न करता तशीच सोडून देण्यात आल्याचा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला.

​जागामालक राजेशाही थाटात वावरतात, नगरपंचायतीने त्यांना साथ दिली. विहिरीला संरक्षक कुंपण घातले असते तर दोन कुटुंबं आणि त्यांची पुढील पिढी उद्ध्वस्त झाली नसती. शासन मृतांच्या कुटुंबीयांना पैसे देईल, परंतु त्याचा उपयोग काय? मृतांच्या कुटुंबीयांची १०-१० एकर जमीन आहे, पण त्यांना वारस राहिला नाही.

सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मदतीचे काय करायचे, अशा प्रश्नांचा भडिमार करीत, आधीच विहीर सुरक्षित करण्यासाठी खर्च केला असता तर ही वेळ आली नसती, असा रोष व्यक्त झाला. या दुर्घटनेला जबाबदार जागामालक व नगरपंचायतीतील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.

​दिंडोरी तालुक्यासाठी हा काळा दिवस आहे. विहिरीच्या कठड्याची उंची अतिशय कमी आहे. जागामालकाने घराला संरक्षक कुंपण केले, परंतु विहिरीला केले नसल्याची तक्रार आहे. या विहिरीत जनावरे पडली होती, खरे तर तेव्हाच उपाययोजना होणे आवश्यक होते. विहीर मालकावर गुन्हा दाखल झाला आहे. या ठिकाणी काही कार्यक्रमांनिमित्त येणे-जाणे होत असते, तेव्हा धोकादायक विहिरीला संरक्षणात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत अशी चर्चा व्हायची. या प्रकरणी दोषींवर तातडीने कठोर कारवाई केली जाईल. विहिरीच्या समीप सिमेंट रस्ता बनविणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. – नरहरी झिरवळ (मंत्री, अन्न व औषध प्रशासन विभाग).