Dindori दिंडोरी विधानसभा मतदारसंघ – १२२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, दिंडोरी मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि पेठ या दोन तालुक्यांचा समावेश होतो. दिंडोरी हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती – ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरहरी सिताराम झिरवाळ हे दिंडोरी ( Dindori ) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील धनराज महाले यांची बंडखोरी झाली आहे.
नरहरी झिरवाळ अजित पवारांच्या मर्जीतले आमदार पण…
विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. अशात दिंडोरी ( Dindori ) मतदारसंघात यावेळी पुन्हा नरहरी झिरवाळच निवडणूक लढवणार का? की वेगळं चित्र दिसणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नरहरी झिरवाळ हे महाविकास आघाडीच्या कार्यकाळात विधानसभेचे उपाध्यक्ष होते. शिवसेना फुटल्यानंतर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठीचं पत्र हे त्यांनाच पाठवण्यात आलं होतं. अजित पवार गट जेव्हा सत्तेत सहभागी झाला तेव्हा नरहरी झिरवाळही त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले. नुकत्याच मंत्रालयातल्या जाळ्यांवर उड्या टाकून आंदोलन करणाऱ्या आंदोलक आमदारांमध्येही झिरवाळ यांचा सहभाग होता. अजित पवारांच्या मर्जीतले आमदार अशी झिरवाळ यांची ओळख आहे. तरीही त्यांनी सरकारविरोधी आंदोलनात सहभाग घेतला. आता याचा परिणाम तिकिट मिळताना होतो का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दिंडोरीचं ऐतिहासिक महत्त्व काय?
रांताळ हे ठिकाण दिंडोरीतलं ( Dindori ) महत्त्वाचं ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर जेव्हा स्वारी केली तेव्हा छत्रपती शिवाजी राजे आणि मुघल यांच्यातील युद्धाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. तसंच दिंडोरीत वणी हे गाव येथं या ठिकाणी सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी दुर्गामातेचं अर्धशक्तिपीठ म्हणून हे ठिकाण ओळखलं जातं. वणी हे गाव दिंडोरीपासून ५५ किमी अंतरावर आहे.
राजकीय माहिती
दिंडोरी ( Dindori ) विधानसभा मतदारसंघ हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा (विधानसभा) मतदारसंघांपैकीएक आहे. हे अनुसूचित जमाती (ST) समुदायासाठीराखीव आहे. दिंडोरी (दिंडोरी) विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे, तसेच चांदवड , कळवण , नांदगाव , निफाड आणि येवला या पाच विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे . सर्व मतदारसंघ नाशिक जिल्ह्यात आहेत.
हवामानाची स्थिती कशी असते?
मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.
२००९ ची स्थिती काय होती?
२००९ ला शिवसेनेचे धनराज महाले यांचा या मतदार संघात निसटता विजय झाला. धनराज महालेंना ६८ हजार ५६९ मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळ यांना ६८ हजार ४२० मतं मिळाली. यानंतर शरद पवारांनी पुढच्या निवडणुकीत नरहरी झिरवाळांनाच तिकिट दिलं आणि त्यांनी विजय खेचून आणला.
२०१४ ला झिरवळांचा विजय
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात ( Dindori ) नरहरी झिरवाळ यांचा विजय झाला. त्यांना ६८ हजार २८४ मतं मिळाली तर शिवसेनेच्या धनराज महालेंना ५५ हजार ६५१ मतं मिळाली. नरहरी झिरवाळ यांनी २००९ च्या पराभवाचं अपयश या निवडणुकीत धुवून काढलं. २०१४ मध्ये मोदी लाट असूनही ते निवडून आले हे विशेष.
२०१९ लाही राष्ट्रवादीकडेच आमदारकी
दिंडोरी या मतदारसंघावर नरहरी झिरवाळ यांनी वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही ते विजयी झाले. या निवडणुकीत त्यांना १ लाख २४ हजार ५२० मतं मिळाली. तर शिवसेनेने भास्क गावित यांना तिकीट दिलं होतं. पण त्यांना ६३ हजार ७०७ मतं मिळाली. नरहरी झिरवाळ हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले.