धुळे: Police Constable Recruitment जिल्हा पोलीस दलातर्फे घेण्यात येणाऱ्या ४२ पदांच्या भरतीसाठी आलेल्या तृतीयपंथी चांद तडवीला गुरुवारी निराशेने परतावे लागले. शासनातर्फे अजूनपर्यंत तृतीयपंथीयांसाठी भरती प्रक्रियेचे मैदानी चाचणीचे, शारीरिक मोजमापाचे धोरण ठरले नसल्याने त्याला परतावे लागले. शासनाकडून धोरण निश्चिती झाल्यानंतर त्याला भरतीसाठी बोलविण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी ’लोकसत्ता’ला दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चांद तडवी उर्फ बेबो जोगी (२७, सोयगाव, औरंगाबाद) हा तृतीयपंथी औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथील राजकोर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. लग्न समारंभात बिदागी मागून तो स्वत:चे शिक्षण पूर्ण करीत आहे. चांद हा येथील पोलीस भरतीसाठी आला होता. ४२ पदांच्या भरती प्रक्रियेसाठी त्याने अर्ज केला होता. गुरुवारी चौथ्या दिवशी मुलींसाठी मैदानी चाचणी घेण्यात येत असल्याने चांदला गुरुवारी बोलविण्यात आले होते. यामुळे चांद हा बुधवारी रात्रीच येथे दाखल झाला होता. त्याच्या निवासाची सोयही पोलिसांनी केली होती.

हेही वाचा >>> सिन्नरच्या अपहृत बालकाची संशयितांकडून सुटका; पोलिसांकडून दोन संशयित ताब्यात

परंतु, येथील यल्लमा मंदिरात पार्वती परशुराम जोगी, संदल जोगी, स्वरा जोगी, निलू जोगी यांनी त्याची जेवणाची आणि राहण्याची सोय केली. यानंतर त्याने गुरुवारी सकाळी पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर हजेरी लावली. यावेळी त्याने पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची भेट घेत भरती प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याची विनंती केली. यानंतर त्याच्या कागदपत्रांची पडताळणी होऊन त्याला उमेदवारी जाहीर झाली. परंतु, शासनाकडून तृतीय पंथीयांसाठीचे मैदानी चाचणीचे आणि शारीरिक मोजमापाचे धोरण ठरले नसल्याची माहिती देत बारकुंड यांनी चांदची समजूत घालत त्याला थांबविले.

हेही वाचा >>> “शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे?”, भुजबळांचा सवाल; म्हणाले, “जो व्यक्ती…”

शासनाकडून धोरण ठरल्यास लवकरच भरतीसाठी बोलविले जाईल, असा दिलासा बारकुंड यांनी चांदला दिला. यामुळे चांद निराशेने त्याच्या गावाकडे परतला. दरम्यान, चांदने शासनाकडून तृतीयपंथीयांना पोलीस भरतीत शारीरि आणि मैदानी चाचणीत काहीशी सवलत मिळावी, अशी मागणी केली आहे. इतर उमेदवारांपेक्षा आम्हाला धावण्याचे अंतर, गोळाफेकीचे अंतर कमी करुन मिळावे. कारण, आमची शस्त्रक्रिया झालेली असल्याने धावताना आणि अन्य मैदानी चाचणी देताना इजा होऊ शकते. शिवाय, तृतीयपंथींयांना पोलीस भरतीसाठीच्या निर्णयानंतर भरतीच्या सरावाला वेळच कमी मिळाला असल्याकडे त्याने लक्ष वेधले. पोलीस खूप कठोर असतात, असा समज होता. परंतु, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सर्व भीती घालवली. तु पुढेही सराव आणि अभ्यास सुरु ठेव. शासनाकडून धोरण ठरल्यास लवकरच भरतीसाठी बोलविण्यात येईल, असा धीर त्यांनी दिला. सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी प्रेमळपणे वागल्याचे चांदने सांगितले.

 शासनाने तृतीयपंथीयांसाठी धोरण अजून ठरविलेले नाही. त्यांच्यासाठी शारीरिक मोजमाप काय धरावे. छाती, उंची, वजन काय धरावे, मैदानी चाचणीचे निकष काय धरावे. याबाबत काहीही धोरण ठरलेले नाही. आमच्याकडे भरतीसाठी तृतीयपंथी आल्याची माहिती आम्ही शासनाकडे कळविली आहे. त्याची कागदपत्र पडताळणी होऊन त्याला उमेदवारी जाहीर झाली आहे. शासनाचे धोरण ठरल्यास त्याला लवकरच भरतीसाठी बोलविण्यात येईल. -संजय बारकुंड (पोलीस अधीक्षक, धुळे)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disappointment of third parties who come for police recruitment impact government lack of policy determination ysh
First published on: 06-01-2023 at 10:42 IST