नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या विभाजनाविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा: पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अर्धनग्न मोर्चा स्थगित|discussion with cm eknath shinde about division of ambad police station movement suspended in nashik | Loksatta

नाशिक: अंबड पोलीस ठाण्याच्या विभाजनाविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा: पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अर्धनग्न मोर्चा स्थगित

अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करण्याच्या मागणीसाठी नाशिकडून मुंबईसाठी निघालेला अर्धनग्न मोर्चा काही अंतर गेल्यानंतर स्थगित करण्यात आला.

नाशिक: अंबड पोलीस ठाण्याच्या विभाजनाविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा: पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अर्धनग्न मोर्चा स्थगित
नाशिक: अंबड पोलीस ठाण्याच्या विभाजनाविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा

अंबड पोलीस ठाण्याच्या विभाजनाविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार असून त्यासंदर्भातील माहिती मोर्चेकऱ्यांना देण्याचे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्यानंतर नाशिक-मुंबई अर्धनग्न मोर्चा काही अंतर गेल्यानंतर स्थगित करण्यात आला.
अंबड गाव, अंबड औद्योगिक वसाहत, चुंचाळे, दत्तनगर घरकुल आदी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र ठाण्याच्या निर्मितीसाठी स्थानिक नागरिकांसह माजी लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत नाशिक ते मुंबई अर्धनग्न पायी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार मंगळवारी सकाळी अंबड येथील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे. रामदास दातीर यांच्यासह इतरांनी एकत्र येत एक्स्लो पॉइंटपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुंबईकडे चालणे सुरु केले. गरवारे पॉइंटपर्यंत मोर्चेकरी पोहचले असताना आ. सीमा हिरे यांनी त्यांना गाठून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनीही मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली. त्यातील निवडक लोकांना सोबत घेत आमदार हिरे यांच्या वाहनातून जिल्हाधिकारी कार्यालयात आणले.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यृ

जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चेकऱ्यांशी पालकमंत्री दादा भुसे यांनी चर्चा केली. नवीन पोलीस ठाण्याच्या प्रस्तावाबाबत ज्या काही अडचणी होत्या, त्याविषयी अहवाल तयार करण्यात आला असल्याची माहिती मोर्चेकऱ्यांना देण्यात आली. भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असून याविषयी मोर्चेकऱ्यांना अवगत करण्यात येईल, असे सांगितले. पुढील १५ दिवसात अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन न झाल्यास अर्धनग्न अवस्थेत मुंबई गाठण्याचा इशारा साहेबराव दातीर यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 17:10 IST
Next Story
जळगाव जिल्ह्यातील अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यृ