scorecardresearch

कृत्रिम पायांचे १७८ जणांना वाटप;अपंगांच्या मदतीसाठी संस्थांचा पुढाकार

कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पाय गमवावा लागलेल्यांना पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शहरातील संस्थांकडून पुढाकार घेण्यात येत आहे.

नाशिक : कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पाय गमवावा लागलेल्यांना पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शहरातील संस्थांकडून पुढाकार घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत नवकार आशिष सेवा ट्रस्ट यांच्या वतीने ७५ गरजूंना कृत्रिम पायांचे (जयपूर फूट) तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने १०३ जणांना कृत्रिम पाय आणि इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले.

• नवकार आशिष ट्रस्टतर्फे ७५ जणांना मदत
नवकार आशिष सेवा ट्रस्टतर्फे श्री महावीर धर्मार्थ दवाखाना संचलित आरएमडी रुग्णालयात ७५ गरजू अपंगांना जयपूर फूट वितरित करण्यात आले. त्यासाठी पुण्याच्या साधू वासवानी ट्रस्टने सहकार्य केले. अध्यक्षस्थानी जे. सी. भंडारी होते. यावेळी भंडारी यांनी ट्रस्टच्या वतीने नुकतेच ३२ खोल्या असणारे वसतिगृह घेण्यात आले असून त्याचा अनेक गरजू विद्यार्थ्यांना लाभ होत असल्याचे सांगितले. अपंगांच्या सेवेसाठी महावीर धर्मार्थ दवाखान्यात कायमस्वरूपी विनामूल्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. नवकार आशिष सेवा ट्रस्टतर्फे गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात येतात. रक्तदान शिबिरे घेण्यात येतात. रुग्णांवर विनामूल्य उपचार करण्यात येतात, असे त्यांनी नमूद केले. व्यासपीठावर साध्वी प्रितीसुधा, ग्यानप्रभा यांच्या शिष्या पुष्पचुला यासह इतर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिजलाल कटारिया, नरेंद्र बाफना, प्रकाश गांधी, बालचंद मुग्धिया उपस्थित होते. विश्वस्त संदीप गांग यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अश्विनी कांकरिया यांनी स्वागतगीत सादर केले. प्रितीसुधा, नियमदर्शना आणि आभा यांचे प्रवचन झाले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारवाडी युवा मंच, समकित ग्रुप, महावीर सेवा फाउंडेशन, उमीद फाउंडेशन तसेच नवकार ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
• कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे १०३ लाभार्थ्यांना मदत
शहरातील कुसुमाग्रज प्रतिष्ठान, विश्वास ज्ञान प्रबोधिनी, नागपूरचे मिशन इन्स्स्टिटय़ूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अॅतण्ड अॅुक्शन आणि चेन्नईचे फ्रीडम ट्रस्ट आणि नागपूरचे हॅपाग लॉयड तसेच जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज स्मारक येथे आयोजित शिबिरात १०३ लाभार्थीना १० लाखाहून अधिक रकमेचे कृत्रिम पाय आणि वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मार्गदर्शन केले. अपंगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन सकारात्मक असून त्यासाठी विविध सामाजिक संस्था आपुलकीच्या जाणिवेतून कार्यरत आहेत.
अपंगांमध्ये सक्षम व्यक्ती म्हणून जगण्याचे सामथ्र्य अशा संस्थांकडून निर्माण होत असते. त्यामुळेच त्यांच्यात नवे काही करण्याची उमेद निर्माण होते. शासकीय यंत्रणेमार्फत अपंगांसाठी अनेक योजना असून त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचविण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, त्यांच्यात हक्कांबद्दल जागृती निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
हॅपाग लॉयडचे कार्यकारी संचालक डॉ. सच्चिदानंद शर्मा यांनी अपंगांविषयीचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची गरज मांडली. सर्वानी मदतीचा व आपुलकीचा हात द्यावा. त्यांच्यातून त्यांच्यात जीवन जगण्याची, खंबीरपणेउभे राहण्याची जिद्द निर्माण होईल. सामाजिक संस्थांनी निरपेक्ष भावनेने काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. फ्रीडम ट्रस्टचे संस्थापक संचालक डॉ. सुंदर सुब्रमण्यम यांनी अपंग व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने सर्वच क्षेत्रात वेगळेपण सिद्ध करत असून त्यासाठी त्यांना समजून घ्यावे, त्यांचे मुलभूत प्रश्न सोडवावेत, असे सांगितले.
विश्वास ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक आणि मार्गदर्शक विश्वास ठाकूर यांनी निश्चित ध्येय घेऊन समाज विकासासाठी संस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले.
(नाशिक येथे नवकार आशिष सेवा ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात गरजू अपंगांना कृत्रिम पायांचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे, लाभार्थीसह संस्थेचे पदाधिकारी)

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Distribution artificial limbs 178 persons initiatives organization help disabled amy

ताज्या बातम्या