नाशिक : तेजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणून गणल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनच्या पूर्वसंध्येला बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. केरसुणी, पणत्या, फूल विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी झाली आहे. सकाळी फुलांचे वधारलेले दर आवक वाढल्यानंतर कमी झाले. लक्ष्मी पूजनाची जय्यत तयारी नागरिकांबरोबर व्यापारी वर्गानेही सुरू केली आहे. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले असून बाजारपेठांमध्ये गर्दीने नवा उच्चांक गाठला.

 गेल्या काही दिवसांपासून गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या बाजारपेठांमधील गर्दी बुधवारी सायंकाळपर्यंत कायम राहिली. व्यापारी, व्यावसायिकांसाठी लक्ष्मीपूजनाचे महत्त्व अधिक असते. या दिवशी खतावण्या, चोपडय़ांसह धनाची पूजा करताना त्यांच्यामार्फत आपली दुकाने, कार्यालये फुलांनी सुशोभित करण्यावर प्रामुख्याने भर दिला जातो. सर्वसामान्य नागरिक देखील फुलांची सजावट करण्यात मागे राहात नाही.

बुधवारी सकाळपासून ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणात झेंडूची फुले बाजारात दाखल झाली. सकाळी झेंडूच्या फुलांचे दर १०० ते १५० रुपये जाळी असे होते. मात्र सायंकाळी उशिरा दर खाली उतरण्यास सुरुवात झाली. दसऱ्या पाठोपाठ दिवाळीतही झेंडूच्या फुलांची मागणी, दर टिकून आहे. मनमाड बाजार समितीत झेंडूच्या फुलांची  सुमारे ७०० क्विंटल आवक झाली तर बाजारभाव ५०० ते १९५०, सरासरी १३०० ते १५०० रुपये प्रतििक्वटल होते.

शहर व ग्रामीण भागात फुलांबरोबर केरसुणीही खरेदी केली जात होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराघरांत केरसुणीला लक्ष्मीच्या स्वरूपात पुजले जाते. खरेदीसाठी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधण्याचा अनेकांचा प्रयत्न होता. सराफ बाजार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी झाल्याचे दिसत होते. दुसरीकडे, फटाक्यांचा खरेदीकडे अनेकांचा कल होता. लक्ष्मीपूजनानंतर फटाक्याची आतिशबाजी करण्यात येते. फटाका दुकानांमध्ये बालगोपाळांसह मोठय़ांची गर्दी झाली.

सोने खरेदीचा उत्साह

गेल्या वर्षी करोना संकटामुळे ग्राहकांना सोने खरेदी करता आली नाही. यंदा निर्बंध शिथिल झाल्याने सोने खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत सोने आठ हजारांनी स्वस्त झाले असून एक तोळा चोख सोन्यासाठी ४८,५०० दर आहे. लग्नसराईमुळे पारंपरिक दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, पेशवाई दागिने यासह गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोने खरेदी होत आहे. याशिवाय कॉर्पोरेट क्षेत्रात दिवाळीनिमित्त भेट देण्यासाठी चांदीच्या नोटा, देवीच्या मूर्ती, नाणे आदींची मागणी वाढत आहे. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येलाच अनेकांनी नोंदणी केल्याची माहिती सराफ व्यावसायिक चेतन राजापूरकर यांनी दिली.

शहर व ग्रामीण भागात झेंडूच्या फुलांची मोठय़ा प्रमाणात आवक झाली.