नाशिक : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचा समावेश करावा, अशी मागणी सिन्नर इंडस्ट्री अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे (सीमा) करण्यात आली आहे. डीएमआयसीच्या माध्यमातून नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार असल्याचा मुद्दा सीमा संघटनेने महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे मांडला आहे.

डीएमआयसीच्या पहिल्या टप्प्याच्या नियोजनाच्या वेळी सिन्नर-नाशिक परिसराचा समावेश होण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यावेळी उद्योगांसाठी आवश्यक पाणी व आरक्षणाबाबत अडचणी असल्याचे कारण पुढे आल्याने नाशिकचा पहिल्या टप्प्यात समावेश होऊ शकला नाही. परिणामी, छत्रपती संभाजीनगर येथील सेंद्रा-बिडकीन परिसराचा औद्योगिक केंद्र म्हणून विकास करण्यात आला. मात्र, गेल्या दशकभरात सिन्नरच्या औद्योगिक परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला असून, आज सिन्नर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे आणि वेगाने विकसित होणारे औद्योगिक केंद्र बनले आहे.

माळेगाव, मापरवाडी, गुळवंच तसेच परिसरातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग कार्यरत असून, भविष्यातील औद्योगिक विस्तारासाठीही मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध असल्याचे सीमाचे सचिव बबन वाजे यांनी सांगितले. डीएमआयसीमुळे कोल्ड स्टोरेज, फूड प्रोसेसिंग, कृषी प्रक्रिया आणि निर्यातक्षम उद्योगांना चालना मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. याशिवाय नवीन गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे सीमाचे उपाध्यक्ष किरण भंडारी यांनी सांगितले.

सिन्नरला पायाभूत सुविधांचा आधार

सिन्नरला समृद्धी महामार्ग, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे तसेच नाशिक विमानतळाची सुविधा उपलब्ध आहे. प्रस्तावित सुरत-चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे सिन्नर व नाशिकचे औद्योगिक महत्त्व आणखी वाढणार आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट व दिघी बंदराशी असलेली जवळीक सिन्नरला मोठा फायदा मिळवून देणारी आहे.

देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणी

नाशिकमध्ये ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, फार्मास्युटिकल, कृषी प्रक्रिया, वाईनरी तसेच विविध उत्पादन क्षेत्रांतील उद्योगांचे मजबूत जाळे आहे. त्यामुळे डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात सिन्नरचा समावेश झाल्यास या उद्योगांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, आधुनिक लॉजिस्टिक्स आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी अधिक प्रभावी जोडणी मिळू शकते, असे सीमाचे अध्यक्ष सुकुमार नायर यांनी म्हटले आहे.

पाण्याचा प्रश्न सोडविणे शक्य

सिन्नरच्या औद्योगिक विकासासाठी आता नियोजित औद्योगिक पाणीवाटप, जलसंधारण, सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापराच्या माध्यमातून भविष्यातील पाण्याची गरज भागविणे शक्य आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या गारगाई-देव नदीजोड प्रकल्पाच्या (दमणगंगा-वैतरणा-गोदावरी) माध्यमातून सिन्नर व नाशिक परिसरातील उद्योगांसाठी पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिन्नरला डीएमआयसीपासून दूर ठेवणे योग्य ठरणार नसल्याकडे पदाधिकारी अरुण चव्हाणके यांनी लक्ष वेधले.