मनमाडमधील डॉक्टर मारहाणीचे पडसाद

मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या वैद्यकीय अधिकारी व परिचारिका मारहाण प्रकरणाचे पडसाद जिल्ह्यात सर्वत्र उमटल्याने डॉक्टरांनी काम बंदची हाक दिली. डॉक्टरांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे सोमवारी रुग्णाचे हाल झाले. मात्र दुपारी आरोग्यमंत्री तसेच प्रधान सचिव यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे तूर्तास संप स्थगित करण्यात आला.

रविवारी सकाळी ८.३०च्या सुमारास मनमाड उपजिल्हा रुग्णालयात कामावर असलेल्या डॉ. संदीप धोंगडे व परिचारिका शोभा आहेर यांना त्याच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या संशयित मुमताज शेख, बदलू मजहर सय्यद व एका अज्ञात संशयिताने उपचार व्यवस्थित करत नाही असा आरोप करत शिवीगाळसह मारहाण केली. या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्य़ात उमटले. जिल्हा शासकीय रुग्णालयांसह सर्व ग्रामीण, उपरुग्णालयांसह प्राथमिक रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मनमाडसह अन्य सरकारी रुग्णालयांत सोमवारी बाह्य़ रुग्ण विभाग बंद राहील, असे फलक लावण्यात आले.

सर्वसामान्यांना याची कल्पना नसल्याने नेहमीप्रमाणे रुग्ण ठिकठिकाणी तपासणीसाठी आले. मात्र त्यांना रुग्णालयाच्या आवारात ताटकळत राहावे लागले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. बी. पवार रुग्णालयात तळ ठोकून होते. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. तातडीच्या रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, तसेच मनमाड उपजिल्हा रुग्णालयात २४ तास सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करावा असे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले. तर रुग्णसेवा समितीच्या पाठपुराव्यातून उपजिल्हा रुग्णालयात १५ दिवसांत सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात येतील, अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली.

दरम्यान, जिल्हास्तरावर सोमवारी सकाळपासून रुग्णांची परवड होण्यास सुरुवात झाली. तात्कालिक सेवा म्हणून रुग्णालय सुरू असले तरी अनेक महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया संपामुळे रखडल्या.  संपामुळे जिल्ह्यतील चार ते पाच हजार रुग्णांचे हाल झाले. अनेकांना नाइलाजास्तव खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला.

या पाश्र्वभूमीवर विविध संघटनांच्या शिष्टमंडळांनी एकत्रितपणे आरोग्यमंत्री दीपक सावंत तसेच प्रधान सचिव, संचालक यांच्या समवेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.

या मागण्यांना वरिष्ठ स्तरावरून सकारात्मक प्रतिसाद दिला गेला. शासकीय रुग्णालयांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपअधीक्षकांची बैठक घेऊन नियोजनाच्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली आहे. तसेच, डॉक्टरांवर हल्ला करणारे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन सावंत यांनी दिल्याने दुपारनंतर संप स्थगित करण्यात आला. दुपारी बारानंतर सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कामावर रुजू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

तिघांना अटक

मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित मुमताज शेख, बदलू मजहर सय्यद व बबलू या तिघांना सोमवारी दुपारी अटक केली. या संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


संप तूर्तास स्थगित

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्र्याशी चर्चा केल्यानंतर संप तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांबाबत काही तक्रार असेल तर थेट १०४ या टोल फ्री क्रमांक किंवा पोलिसांकडे तक्रार करावी. अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. मात्र डॉक्टरांवर हल्ला करण्याचा किंवा त्यांना मारण्याचा कोणालाही अधिकार नाही.

– डॉ. सुरेश जगदाळे

(जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा शासकीय रुग्णालय)