जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या तीन दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात मोठी दरवाढ नोंदवण्यात आली. बुधवारी सकाळी बाजार उघडताच विशेषतः सोन्यात पुन्हा मोठा बदल झाल्याचे दिसून आले. ग्राहकांसह व्यावसायिक त्यामुळे कोड्यात पडले.
डिसेंबरमध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, स्थिर डॉलर आणि अमेरिकन बाँड उत्पन्नात घट झाल्यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. या वर्षी सोन्याच्या किमती वाढण्यामागे व्याजदर कपातीची अटकळ प्रमुख घटक आहे.
अलिकडच्या आकडेवारीनुसार फेड पुढील महिन्यात २५ बेसिस पॉइंट दर कपात करण्याचा विचार करू शकते, ज्यामुळे अमेरिकन नोकरी बाजारातील मंदी आणि कमकुवत ग्राहक भावना निर्माण होऊ शकतात. तसेच सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
प्रत्यक्षात, जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती बुधवारी सकाळी कमी होताना दिसल्या. कॉमेक्स सोन्याच्या किमती ०.०४ टक्के म्हणजेच १.७० डॉलरने घसरून ४,११४.६० डॉलर प्रति औंसवर व्यापार करत होत्या. तर स्पॉट गोल्डचा दर ०.४३ टक्के म्हणजेच १७.९१ डॉलरने घसरून ४,१०८.९४ डॉलर प्रति औंसवर व्यापार करत होता.
डिसेंबरमध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा वाढत असताना, डॉलर कमकुवत झाल्यामुळे बुधवारी सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा मोठे चढ-उतार दिसून आले. देशांतर्गत वायदा बाजार म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीच्या किमती वाढल्याचे दिसत असले, तरी देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किमती किंचित कमी झाल्या. तथापि, चांदीच्या किमती मजबूत स्थितीत स्थिर राहिल्या.
जळगाव शहरात सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २६ हजार २७८ रूपयांपर्यंत होते. मंगळवारी दिवसभरात आणखी १७५१ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याच्या दराने एक लाख २८ हजार ०२९ रूपयांपर्यंत मजल मारली होती. बुधवारी सकाळी बाजार उघडल्यावर मात्र ८२४ रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह एक लाख २७ हजार २०५ रूपयांपर्यंत खाली आले.
चांदीचे दर स्थिर
शहरात सोमवारी चांदीचे दर २०६० रूपयांची वाढ नोंदवली गेल्यानंतर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५६ हजार ५६० रूपयांपर्यंत होते. मंगळवारी दिवसभरात पुन्हा तब्बल ५१५० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीचे दर एक लाख ६१ हजार ७१० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते. बुधवारी सकाळी बाजार उघडल्यावर मात्र कोणतीच वाढ अथवा घट नोंदवली गेली नाही. त्यामुळे चांदीचे दर एक लाख ६१ हजार ७१० रूपयांवर स्थिरावले.
