नाशिक : सातपूर गावठाण परिसरात उघडय़ावर पडलेल्या कचऱ्यावरून महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त रमेश पवार यांनी विभागीय अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. शहरात कुठेही उघडयावर कचरा पडलेला दिसणार नाही, यासाठी नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली.
पालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयुक्त पवार हे विविध भागातील कामांची पाहणी करीत आहेत. प्रारंभी गोदापात्रातील तसेच गोदाकिनाऱ्यावरील कामांची त्यांनी पाहणी केली. स्मार्ट सिटी योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामांना विलंब होत असल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. गोदाकाठी इतस्त: लहान विक्रेते टपऱ्या टाकून व्यवसाय करीत असल्याचे पाहून त्यांचे व्यवस्थित नियोजन कसे करता येईल, त्याविषयी आराखडा तयार करण्यासही सांगितले आहे.
शहराच्या पाहणी दौऱ्याअंतर्गत सोमवारी त्यांनी सातपूर भागास भेट दिली. सातपूर गाव, प्रबुद्ध नगर, अंबड लिंक रोड परिसरात पाहणीवेळी काही ठिकाणी कचरा दृष्टीपथास पडला. सध्या ज्या ठिकाणी कचरा फेकला जातो, तो सर्व कचरा घंटागाडीत जाईल या दृष्टीने उपाय योजण्यास सांगण्यात आले आहे. भाजी मंडई, सातपूर गाव, खोका मार्केट, नासर्डी पूल, सातपूर औद्योगिक वसाहत, त्र्यंबक रस्ता, नंदिनी पूल या परिसरात नियमित स्वच्छता राहील, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी विभागीय अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन संचालकांना दिल्या.
अमृत गार्डन ते बारदान फाटा रस्त्याचे रुंदीकरण प्रगतीपथावर आहे. विकास आराखडय़ानुसार सर्वेक्षण करून त्यामध्ये रस्त्यात येणारे अडथळे अतिक्रमण, भूसंपादन याबाबत अहवाल तयार करावा. तसेच रस्त्याचा विकास करताना अस्तित्वातील वृक्षांची जोपासना होईल, ती काढून टाकावी लागणार नाहीत, याचे नियोजन करण्याचे सूचित करण्यात आले आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, शहर अभियंता नितीन वंजारी, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड, विभागीय अधिकारी नितीन नेर आदी उपस्थित होते.