कडाक्याच्या थंडीने द्राक्ष उत्पादकांना दुहेरी झळ

जानेवारीच्या अखेरच्या टप्प्यात अवतरलेल्या कडाक्याच्या थंडीने द्राक्ष उत्पादकांचे आर्थिक समीकरण बिघडले आहे.

बागा अडचणीत, मालाला उठाव कमी

अनिकेत साठे

नाशिक : जानेवारीच्या अखेरच्या टप्प्यात अवतरलेल्या कडाक्याच्या थंडीने द्राक्ष उत्पादकांचे आर्थिक समीकरण बिघडले आहे. घटत्या तापमानाने परिपक्व होण्याच्या स्थितीत असणाऱ्या द्राक्षांमध्ये साखर उतरण्याची प्रक्रिया मंदावली असून तयार द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती आहे. देशातील अनेक भागांत थंडीची लाट आहे. करोनाच्या संकटात सर्दी, खोकल्याच्या धास्तीने द्राक्षांना अपेक्षित मागणी नाही. परिणामी, स्थानिक द्राक्ष उत्पादक दुहेरी कोंडीत सापडले आहेत.

जिल्ह्यात पावणेदोन लाख एकर क्षेत्रावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. यातील साधारणत: ३० ते ३५ टक्के द्राक्ष परिपक्व होण्याच्या मार्गावर आहे. जानेवारीच्या मध्यानंतर थंडी जशी कमी होऊ लागते, तशी द्राक्षांची मागणी वाढते. यंदा द्राक्ष हंगाम सुरू होताना थंडीची तीव्रता वाढल्याने उत्पादकांसमोर नवे संकट उभे ठाकले. दिवसागणिक घटणाऱ्या तापमानाने मंगळवारी ६.३ ही नवीन नीचांकी पातळी गाठली. कमालीच्या गारठय़ात द्राक्षवेलींची चयापचय क्रिया थंडावते. त्यामुळे द्राक्ष मण्यांमध्ये साखर उतरण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली. तापमान आणखी खाली गेल्यास तयार द्राक्षांना तडे जाण्याची शक्यता द्राक्ष बागाईतदार संघाचे (नाशिक) विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे यांनी व्यक्त केली. थंडीच्या लाटेतून बागा वाचविण्यासाठी उत्पादकांना कसरत करावी लागत आहे. निफाड तालुक्यात बागांमध्ये शेकोटय़ा पेटविल्या जात आहेत. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी करावी लागणार आहे. जमिनीतील तापमान कायम राखण्यासाठी बागांना पाणी देण्याच्या वेळेत फेरबदल झाले. सध्या भल्या पहाटे द्राक्ष बागांना पाणी दिले जात असल्याचे निमसे यांनी सांगितले.

कडाक्याच्या थंडीमुळे देशांतर्गत बाजारात द्राक्षांची मागणी वाढू शकली नाही. करोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. आंबट-गोड चवीच्या द्राक्षांनी सर्दी-खोकल्याला निमंत्रण मिळेल, या धास्तीतून त्याचे सेवन टाळले जाते. द्राक्षांना उठाव नसल्याने व्यापारी देशांतर्गत बाजारासाठी थॉमसनला प्रति किलो ३५ तर सोनाका द्राक्षांना ५५ रुपये दर देत असल्याचे उत्पादक सांगतात. निर्यातक्षम रंगीत द्राक्षांना ९० रुपयांहून अधिक तर सोनाकाला ८० रुपयांच्या आसपास दर मिळत आहे. देशातील थंडीची लाट ओसरल्यानंतर द्राक्षांच्या मागणीत वाढ होईल, अशी उत्पादकांना आशा आहे.

नीचांकी तापमानाने समस्यांमध्ये भर

गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यातील साडेदहा हजार हेक्टरवरील द्राक्षांचे नुकसान झाले होते. सटाणा, निफाड, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यातील बागांना फटका बसला होता. या संकटातून बचावलेल्या बागांची काढणी सुरू होण्याच्या मार्गावर आहे. यात थंडीच्या लाटेने अवरोध आला. सोमवारच्या तुलनेत पारा आणखी खाली घसरून ६.३ अंशावर आला. हंगामातील ही नीचांकी पातळी आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात थंडीचा तडाखा अधिक आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा नाशिकच्या हवामानावर प्रभाव पडतो. उत्तरेकडील अनेक भागात बर्फवृष्टी होत आहे. त्या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे गारवा वाढू शकतो. या स्थितीत द्राक्ष बागांना नव्या समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संघाच्या दरास व्यापाऱ्यांचा ठेंगा

हंगामाच्या प्रारंभी द्राक्षांना दिले जाणारे दर व्यापारी नंतर पध्दतशीरपणे पाडतात. ही बाब लक्षात घेऊन मध्यंतरी द्राक्ष बागाईतदार संघाने उत्पादन खर्चाचा हिशेब करून निर्यातक्षम द्राक्षांना प्रति किलोस ८५ तर स्थानिक विक्रीसाठी ५५ रुपये किलो दर जाहीर केले होते. तथापि, अनेक व्यापारी त्या दराने माल खरेदी करीत नसल्याची उत्पादकांची तक्रार आहे. या संदर्भात बागाईतदार संघाकडे तक्रारी होत आहेत. जाहीर केलेल्या दरानुसार द्राक्ष खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांना जाब विचारला जाणार असल्याचे संघाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Double blow grape growers severe cold ysh

Next Story
नाशिक रोड केंद्रात धान्य साठवणुकीत अडथळे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी