scorecardresearch

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जलनीती देशासाठी दिशादर्शक; प्रा. दीपक काळे यांचे प्रतिपादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ ते १९४६ या कालावधीसाठी जलनीती तयार केली होती. भारत हा कृषिप्रधान देश आहे.

Dr Babasaheb Ambedkar Quotes

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ ते १९४६ या कालावधीसाठी जलनीती तयार केली होती. भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यासाठी शेतीला वीज आणि पाणी ही मूलभूत गरज ओळखून राज्यकर्त्यांनी त्यासाठी प्रयत्न केला तर देशातील शेतकरी सुखी होईल. यासाठी बाबासाहेबांनी तयार केलेल्या जलनीतीचा अवलंब करायला पाहिजे आणि त्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करायला पाहिजे, असे प्रतिपादन शिवचरित्र व्याख्याते प्रा. दीपक काळे यांनी केले. येवला तालुक्यातील चिंचोडी येथे प्रा. काळे यांचे शिवराय ते भिमराय या विषयावर व्याख्यान झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रथम संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे, पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे, डॉ. सुरेश कांबळे यावेळी उपस्थित होते.

शिवाजी महाराज हेच एकमेव जाणते राजे आणि उत्कृष्ट प्रशासक होते. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील एक उत्कृष्ट संवादक होते. त्यांनी ३२ पदव्या प्राप्त केलेल्या होत्या. नऊ भाषा अवगत होत्या. समाजातील झेंडय़ांच्या रंगांवरून समाजामध्ये दुफळी निर्माण होते म्हणून शिवरायांनी आपल्या स्वराज्याचा ध्वज भगवा ठेवला होता. शिवाजी महाराजांनी प्रस्थापितांविरुद्ध लढा दिला. बाबासाहेबांनीही प्रस्थापितांविरुद्ध लढा दिला. युद्धनीतीत पराभव माणसाच्या मनात करावा लागतो, नंतर तो रणात होत असतो हे शिवरायांनी दाखवून दिले. शिवरायांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभे केले. सर्व समाजाचे कल्याण करणारे एकमेव राजे शिवराय होते. तर स्वातंत्र्यानंतर सर्व भारतीयांना समता, न्याय, बंधुता देणारे भिमराय एकमेव आहेत. शिवरायांनी वतनदारी बंद केली होती. बाबासाहेबांनी सविधानातून वतनदारीचा कायदा करून समतावादी समाज व्यवस्था निर्माण केली. शिवरायांनी महिलांसाठी आपल्या स्वराज्यात अनेक चांगले नियम तयार केले होते. बाबासाहेबांनी महिलांसाठी हिंदु कोड बिलाची मागणी केली होती. महिलांनादेखील पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत, यासाठी त्यांनी संविधानात कायदे केले. बाबासाहेबांचे कार्यकर्तृत्व जगात देखील गाजलेले आहे. आपले चारित्र्य शिवराय आणि भिमरायासारखे असावे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यसन मुक्त आणि फॅशन मुक्त जीवन जगले पाहिजे तरच आपण शिवराय आणि भीमराय यांचे खरे वारसदार होऊ. असे प्रा. काळे यांनी सांगितले.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड होते. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य सेवादलाचे कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, डॉ. सुरेश कांबळे आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा शाल,गुलाब पुष्प आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र खंड देऊन उत्सव समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.  यावेळी सरपंच रवींद्र गुंजाळ, उपसरपंच नंदूभाऊ घोटेकर, इतर सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद गुंजाळ यांनी केले.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dr babasaheb ambedkar water policy guideline country statement deepak kale ysh

ताज्या बातम्या