नाशिकमध्ये भाजपला बळकटी देण्यासाठीच डॉ. भारती पवार यांना मंत्रिपद

आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे मैदानात उतरू शकते.

डॉ.भारती पवार

नाशिक : सलग दुसऱ्यांदा खासदार झालेल्या नंदुरबारच्या डॉ. हिना गावित यांच्याऐवजी भाजपने प्रथमच लोकसभेत गेलेल्या दिंडोरीच्या डॉ.भारती पवार यांना
केद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यामागे नाशिक जिल्ह्य़ात पक्षाची पाळेमुळे मजबूत करणे आणि  आगामी निवडणुकांच्या पूर्वतयारीचे गणित आहे.

मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात धुळ्याचे डॉ. सुभाष भामरे संरक्षण राज्यमंत्री होते. पण, त्यांचा विषय पक्षाने आधीच बाजूला ठेवला होता. त्यामुळे भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील दोन्ही डॉक्टर महिला खासदारांमध्ये स्पर्धा होती. अखेरीस डॉ. पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पारंपरिक आदिवासी नेत्यांची सद्दी आहे. त्यांचे वर्चस्व मोडून काढण्यास मंत्रिपदाचा उपयोग होऊ शकतो. नंदुरबारमध्ये विधानसभेच्या चार पैकी दोन जागा भाजपकडे आहेत. जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही भाजपचे वर्चस्व आहे. तुलनेत नाशिक जिल्ह्यात त्यांची स्थिती काहीशी कमकु वत आहे. विधानसभेच्या १५ पैकी पाच जागा भाजपकडे आहेत. यात शहरातील तीन मतदार संघ वगळता ग्रामीणमधील केवळ चांदवड-देवळा आणि बागलाण या दोन ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. उर्वरित १० मतदारसंघ राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, एमआयएम यांच्या ताब्यात आहेत. यात विधानसभेच्या आदिवासी राखीव चार मतदारसंघांचाही समावेश आहे.

दिंडोरी लोकसभेत राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांचा येवला आणि विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरी मतदार संघाचा समावेश आहे. लगतच्या मालेगावचे दादा भुसे हे कृषिमंत्री आहेत. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे मैदानात उतरू शकते. नाशिक जिल्ह्य़ात पक्षाला बळकटी आणणे आणि आघाडीच्या तुल्यबळ नेत्यांना शह देण्यासाठी नाशिकला झुकते माप मिळाले असण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dr bharti pawar get ministerial post to make bjp strong in nashik zws