नाशिक – नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे गोदावरी. नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरीचा काठ सर्वांनाच मोहित करतो. त्यात अस्सल चित्रकारांना तर गोदाकाठची मंदिरे, रामकुंड, भोवतालचा परिसर कायमच चित्रणासाठी प्रेरित करीत असतो. त्यामुळेच तर गोदाकाठी कायमच काही चित्रकार कागदावर गोदाकाठचे कोणते ना कोणते चित्र रेखाटण्ग्त मग्न असतात. एका प्रत्यक्ष चित्रण स्पर्धेच्या निमित्ताने असाच चित्रकारांचा जणूकाही कुंभमेळाच गोदाकाठी भरला.

महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था नाशिक कलानिकेतनतर्फे ८१ व्या कलामहर्षी वा. गो. कुलकर्णी राष्ट्रीय प्रत्यक्ष चित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गचित्रण, व्यक्तीचित्रण आणि स्थिरचित्रण या तीन प्रकारच्या स्पर्धा झाल्या. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, वसई, डहाणू, पालघर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, धुळे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना येथील २१४ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. सलग दोन दिवस जणूकाही कलेचा कुंभमेळाच भरला. सुंदर कलात्मक वातावरण गोदाकाठी निर्माण झाले.

८१ व्या कलामहर्षी वा. गो. कुलकर्णी राष्ट्रीय प्रत्यक्ष चित्रण स्पर्धेतील विजेत्यांसाठी सुमारे १ लाख १५००० रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेनंतर लगेचच झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अनिल तुपे उपस्थित होते. नाशिक कलानिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.अविनाश भिडे, सचिव प्रा. संध्या केळकर, चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य संजय साबळे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे पदाधिकारी सुरेश लासुरे, मुक्ता बालिगा, माया कुलकर्णी तसेच चित्रकला महाविद्यालयाचे प्रा. योगेश सूर्यवंशी, प्रा. विशाखा कुलकर्णी, प्रा. समाधान काकड, प्रा. सचिन श्रीमाळी यांचे सहकार्य लाभले.

या स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्यांमध्ये निसर्गचित्रण विभाग : प्रथम – सुनील गवळी (नाशिक), द्वितीय – विशाल सुतार (मुंबई). तृतीय – तुषार कुंभारे (मुंबई). चतुर्थ – श्रेयस आरेकर (वसई). पाचवे – मीत जोशी (वसई). सहावे – श्रुती पाठले (संभाजीनगर), उत्तेजनार्थ- विशाल गणकर, वरूण सिंह, निलेश आदमदे (सर्व मुंबई).

व्यक्तिचित्रण विभागात प्रथम – सागनिक सेन (मुंबई). द्वितीय – राजेश पवार (नाशिक). तृतीय – राहुल वाघ (सोलापूर). चतुर्थ – श्रेयस शहा (विरार). पाचवे – प्रज्ञान पांडे (मुंबई). सहावे – विशाल डिंगणकर (मुंबई). उत्तेजनार्थ – अखिल कोंबडे (मुंबई). सिया कश्यप (मुंबई). प्रेरणा गोंदके (नाशिक)

स्थिरचित्रण विभागात प्रथम- कृष्णा विश्वकर्मा (नाशिक). द्वितीय – राधिका जोशी (नाशिक). तृतीय – मृणाली डोंगरे (नाशिक). उत्तेजनार्थ – रुचिता चौक (नाशिक). आलेख म्हात्रे (वसई), ध्रुवेश मांची (वसई) यांचा समावेश आहे. स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध निसर्ग चित्रकार नानासाहेब येवले आणि प्रसिद्ध अमूर्त चित्रकार उमेश पाटील यांनी केले.

८१ वे कला महर्षी वा. गो. कुलकर्णी राष्ट्रीय वार्षिक चित्रप्रदर्शन ८ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत नाशिक येथील गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. हे स्पर्धात्मक प्रदर्शन महाविद्यालयीन विद्यार्थी व व्यावसायिक विभागाकरिता खुले असून चित्रे जमा करण्याची अंतिम तारीख दोन फेब्रुवारीपर्यंत आहे.

http://www.nashikkalaniketan.com/ या वेबसाइटवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा लाभ सर्व विद्यार्थी, कलावंतांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.