जळगाव : मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असून, यावल तालुक्यातील मनुदेवी मंदिर, पारोळा येथील बालाजी मंदिरांसह ३० हून अधिक मंदिरांत पुढील आठवड्यात ती लागू होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी दिली.

जळगावात यावर्षी फेब्रुवारीत मंदिरे आणि धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ झालेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांच्या उपस्थितीत ३१ मे रोजी झालेल्या बैठकीनंतर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी, पारोळा येथील श्री बालाजी मंदिर यांसह अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला. वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेल्या श्री ओंकारेश्वर मंदिरात महाराष्ट्र मंदिर महासंघाची सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात श्री बालाजी मंदिर (पारोळा), श्री मनुदेवी मंदिर (यावल); श्री पद्मालय देवस्थान (एरंडोल) यांसह ३० पेक्षा अधिक मंदिरांत येत्या सप्ताहात, तर जळगाव जिल्ह्यातील अन्य मंदिरांमध्ये येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत वस्त्रसंहिता लागू करण्याचे घोषित करण्यात आले. 

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
kolhapur, mahalaxmi mandir, mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मी देवी मूर्ती संवर्धनास स्थगिती देण्यात यावी, जबाबदारी निश्‍चित करा; महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण

मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, हे व्यक्तिस्वातंत्र्य असू शकत नाही. प्रत्येकाला आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत, याचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. मात्र, मंदिर हे धार्मिक स्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तिस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे, असे घनवट यांनी सांगितले. पारोळा येथील बालाजी मंदिराचे विश्वस्त केशव क्षत्रिय यांनी भारतीय वस्त्र पाश्चात्त्यांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आणि सभ्यतापूर्ण असल्याचे सांगितले. सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिराचे सचिव नीलकंठ चौधरी यांनी मंदिर संस्कृती रक्षणासाठी वस्त्रसंहिता अत्यावश्यक असल्याचे मांडले. 

सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी वस्त्रसंहितेचे आध्यात्मिक स्तरावर काय महत्त्व आहे, ते सांगितले. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे विधी सल्लागार आणि महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ भरत देशमुख यांनी मंदिरातील सात्त्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची असेल, तर आपले आचरण आणि वेशभूषा सात्त्विक असायला हवी, अशी महाराष्ट्र मंदिर महासंघाची भूमिका असल्याचे सांगितले. जळगाव येथील ओंकारेश्वर मंदिराचे जुगलकिशोर जोशी आणि एरंडोल येथील प्राचीन श्री पद्मालय मंदिराचे विश्वस्त डॉ. पांडुरंग पिंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

कोणत्या मंदिरांत वस्त्रसंहिता लागू होणार ?

ओंकारेश्वर मंदिर (जळगाव), बालाजी मंदिर (पारोळा), महर्षी व्यास मंदिर (यावल), पद्मालय देवस्थान (एरंडोल), कष्टभंजन देव हनुमानजी मंदिर (सुनसावखेडा), सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिर (यावल), श्रीराम मंदिर (पारोळा), विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (पिंपरी, जामनेर), मारुती मंदिर (प्रजापतीनगर, जळगाव), पंचमुखी मारुती मंदिर (जळगाव), शनी मंदिर (सिंधी कॉलनी, जळगाव), दक्षिणमुखी मारुती मंदिर (गोलाणी व्यापारी संकुल, जळगाव), उमा महेश्वर मंदिर (उमाळे, ता. जि. जळगाव), शिवधाम मंदिर (जळगाव), इच्छादेवी मंदिर (जळगाव), कालिंकामाता मंदिर (जळगाव), सूर्यमुखी हनुमान मंदिर (विवेकानंदनगर, जळगाव), अष्टभुजा मंदिर (भुसावळ), स्वयंभू मुजुमदार गणपती मंदिर (चोपडा), हरेश्वर महादेव मंदिर (चोपडा), बालवीर हनुमान मंदिर (चोपडा), नवग्रह मंदिर (शेतपुरा, चोपडा), वरद विनायक मंदिर (प्रेमनगर, जळगाव), गजानन महाराज मंदिर (बांभोरी), सातपुडा निवासिनी भवानी माता मंदिर (कुसुंबा, रावेर), साई मंदिर (तुळसाईनगर, जळगाव) यांसह दसनूर येथील मंदिर, पाचोरा येथील दोन मंदिरे आणि भादली येथील सहा मंदिरांत वस्त्रसंहिता लागू होणार आहे.