scorecardresearch

महासंघाद्वारे शेतकऱ्यांचा तिसगाव धरणातील पाण्यावर हक्क; थेट जलवाहिनी, ठिबक सिंचनाचा अनोखा प्रकल्प

थेट जलवाहिनीद्वारे आणि पूर्णत: ठिबक सिंचनाचा हा प्रकल्प दोन तालुक्यातील शेतीला संजीवनी देणारा ठरणार आहे.

drip irrigation project for dindori and chandwad taluka

वणी – दिंडोरी आणि चांदवड या दोन तालुक्यांमधील १२ गावातील शेतकऱ्यांनी तिसगाव धरणावर महासंघाची स्थापना करून वाघाड पाठोपाठ या धरणातील पाण्यावर आपला हक्क प्रस्थापित केला आहे. थेट जलवाहिनीद्वारे आणि पूर्णत: ठिबक सिंचनाचा हा प्रकल्प दोन तालुक्यातील शेतीला संजीवनी देणारा ठरणार आहे.

४५० दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेले तिसगाव धरण आहे. साधारणत: दोन वर्षांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वाघाड धरणातील पाण्याचा वापर परस्परांतील शेतकऱ्यांसाठी आरक्षित करीत महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला होता. त्याच पद्धतीने दिंडोरी आणि चांदवड तालुक्यातील १२ गावांतील शेतकऱ्यांना माणिक पाटील, राजेंद्र सोनवणे यांनी पुढाकार घेत एकत्रित केले. दोन वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर या प्रकल्पास मूर्त स्वरूप प्राप्त झाले. शेती व्यवसायातील आव्हाने, त्यास सामोरे जाताना शेतकऱ्यांची होणारी दमछाक या स्थितीमुळे शेतीकडे कनिष्ठ व्यवसाय म्हणून बघण्याची भावना बळावत आहे. वाढती महागाई, कर्ज अशा संकटांवर मात शेतीतून हाती पडणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने नवी पिढी शेती उद्योगास तयार नव्हती. धरण उशाशी असताना गावे पाण्यासाठी संघर्ष करत होते. पीव्हीसीची क्रांती आणि विजेच्या उपलब्धतेमुळे ओलिताखालील क्षेत्रात झपाट्याने वाढ होत असल्याने पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे द्राक्ष हे नगदी पीक. त्यासाठी भांडवली खर्च मोठा. अशा परिस्थितीत पाण्याची कमतरता राहणार असेल तर आर्थिक संकट मोठे होत जाणार. हे लक्षात घेऊन पाटील आणि सोनवणे यांनी तिसगाव धरणावर महासंघाची स्थापना करण्यासाठी आटापिटा सुरू केला. त्यातून सोसायटीची स्थापना करून हा विषय मार्गे लावण्यासाठी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, बाजार समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील ,अशोक गायकवाड आदींच्या सहकार्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना विश्वासात घेत दोन वर्षात बैठकांचे सत्र राबविले गेले.

हेही वाचा >>> शिवजयंती मिरवणूक : कर्कश ध्वनियंत्रणा, गुलालास मंडळांचा नकार, फलकांवरील मजकूर, छायाचित्रांसाठी परवानगी आवश्यक

८०० ते ९०० लाभधारक शेतकऱ्यांना एकत्र आणून तिसगाव धरण महासंघाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यास पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, तत्कालीन अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, जलसंपदाचे (उत्तर महाराष्ट्र विकास) डॉ. संजय बेलसरे, विभागीय अभियंता विश्वास चौधरी, तत्कालीन शाखा अभियंता नामदेव शिंदे, कालवा निरीक्षक प्रवीण वालझाडे, शाखा अभियंता भूषण दंडगव्हाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याआधारे खेडगाव, बहादुरी, तळेगाव, सोनजाब, बोपेगाव, अंतरवेली, गोंडेगाव, शिंदवड, धोंड, वडनेरभैरव, असे दिंडोरी आणि चांदवड या दोन तालुक्यातील १२ गावांनी मिळून सात सोसायटी स्थापना करून ३१ मार्च २०२२ रोजी राज्यपालांच्या अधिसूचनेनंतर महासंघाची स्थापना केली. संपूर्ण उपसा सिंचन तंत्रज्ञान असलेल्या महासंघाने ठिबक सिंचनाद्वारे आपले क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या जलवाहिनीवर जलमापक यंत्र बसविले जाईल. जेवढे पाणी वापरले जाईल, तेवढीच पाणीपट्टी आकारणी होईल. यापूर्वी कालव्याद्वारे येणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला. जल वाहिनीमुळे त्यास प्रतिबंध लागेल. शिवाय, शासनाचे उत्पन्न वाढणार आहे. सुमारे ९०० हून अधिक शेतकऱ्यांना महासंघाच्या थेट जल वाहिनीतील पाण्याचा लाभ मिळणार आहे. एरवी, मार्च,एप्रिल, मे, महिन्यात धरणातून पाणी उचलण्यासाठी चारही बाजुने इलेक्ट्रिक मोटारींचा विळखा असायचा. परिणामी, शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असे. आता महासंघामुळे शेतकरीच मालक असल्याने पाणी चोरी होणार नाही. पाणी वापराची १०० टक्के वसुली होईल.

सात पाणी वापर संस्थांची स्थापना

तिसगाव धरणासाठी महाराष्ट्र सिंचन पद्धतीने शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कर कायदा २००५ अंतर्गत सात पाणी वापर संस्थांची स्थापना झाली. पालखेड धरणाने त्यांना एक संस्थेची नोंदणी करून परवानगी दिली आहे. पाणी वापर संस्थामध्यें तळेगाव वणी येथील कर्मवीर राजाराम सखाराम वाघ ठिंबक उपसा सिंचन संस्था, खेडगाव येथील दामोदर महाराज ठिबक उपसा सिंचन संस्था, तिसगाव येथील परशारी ठिबक उपसा सिंचन संस्था, सोनजांब येथील महारुद्र ठिबक उपसा सिंचन संस्था, शिंदवड येथील रत्नगड ठिबक उपसा सिंचन संस्था, जऊळके वणी येथील संत मल्हार बाबा ठिबक उपसा सिंचन संस्था आणि बोपेगाव येथील सर्वेश्वरी ठिबक सुपा सिंचन संस्था यांचा समावेश आहे.

वैशिष्ठ्ये काय ?

* ९०० हून अधिक शेतकऱ्यांना लाभ

* जलमापकाद्वारे पाणीपट्टी आकारणी

* पाणी चोरीला प्रतिबंध * गळती थांबणार

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 13:11 IST
ताज्या बातम्या