नाशिक : पहिल्याच पावसात रस्त्यांची झालेली दुरवस्था अपघाताचे कारण ठरू लागली असून वर्दळीच्या अशोका मार्ग परिसरातील रस्त्यावरील खड्डय़ामुळे ४० वर्षांच्या दुचाकीस्वाराला प्राण गमवावे लागले. एका खासगी रुग्णालयासमोर हा अपघात झाला. रस्त्यांवरील खड्डे आणि ठिकठिकाणी चाललेली खोदकामे पावसाळय़ात वाहनधारकांची परीक्षा पाहणारे ठरणार आहेत.

पावसामुळे दरवर्षी शहरातील रस्त्यांची दुरवस्था होते. यंदा पावसाने केवळ एक, दोन वेळा हजेरी लावली आहे. त्यात खड्डय़ामुळे हा अपघात झाला. भावेश कोठारी (४०, राज अपार्टमेंट, बिग बाजार शेजारी, नाशिकरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. कोठारी हे गुरुवारी अशोका मार्गाच्या दिशेने आपल्या दुचाकीवर निघाले होते. एका रुग्णालयासमोर दुचाकी खड्डय़ात आदळल्याने कोठारी हे रस्त्यावर पडले. या घटनेत त्यांच्या डोक्यास मार लागला. बेशुध्दावस्थेत त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे याआधीही अनेक अपघात झाले आहेत. त्यात विविध भागात स्मार्ट सिटी योजनेचे आणि महापालिकेतर्फे अनेक भागांत विकास कामांसाठी रस्ते खोदले गेले आहेत. त्यामुळे पादचारी, वाहनधारकांना आधीच कसरत करावी लागत आहे. यात रस्त्यांवरील खड्डय़ांची भर पडली आहे. खोदकाम आणि खड्डय़ांमुळे धोकादायक बनलेले रस्ते सुरक्षित करण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.