जळगाव : जिल्ह्यातील खवशी (ता. अमळनेर) येथील गाव तलावाच्या पाण्यात बुडून बाप–लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास घडली. खेळत असताना सात वर्षीय मुलगा तलावाच्या पाण्यात उतरला. तो पाण्यात गेल्याचे लक्षात येताच त्याचे वडील त्याला वाचविण्यासाठी तलावात उतरले. मात्र तलावातील गाळात अडकल्याने दोघांनाही बाहेर पडता आले नाही. या घटनेने खवशी गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दुर्घटनेत विरेंद्र उर्फ विरु अण्णा तलवारे (७) आणि त्याचे वडील अण्णा एकनाथ तलवारे (३२) यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरु हा गुरुवारी सकाळी तलाव परिसरात खेळत होता. खेळता खेळता तो तलावाच्या पाण्यात उतरला. सुरुवातीला तो पाण्यात उतरल्याचे लक्षात आले नाही. मात्र काही वेळाने मुलगा तलावात गेल्याचे वडिलांच्या निदर्शनास आले.

मुलाच्या जीवाला धोका असल्याचे लक्षात येताच अण्णा तलवारे यांनी त्याला वाचविण्यासाठी तत्काळ तलावात धाव घेतली. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात अण्णा तलावातील गाळात अडकले. तलावात गाळ मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना स्वतःला बाहेर काढणे कठीण झाले. दरम्यान, विरुही पाण्यात अडकल्याने बाप-लेक दोघेही संकटात सापडले. काही वेळातच दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. दोघांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मदतीसाठीही प्रयत्न करण्यात आले. मात्र बाप-लेकाला वाचविण्यात यश आले नाही. या घटनेनंतर तलाव परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मयत अण्णा तलवारे आणि त्यांचा मुलगा विरु हे मूळचे आर्वी (ता. जि. धुळे) येथील मूळ रहिवासी होते.

उदरनिर्वाहासाठी ते सध्या अण्णा यांची सासुरवाडी असलेल्या खवशी येथे वास्तव्यास होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी ते येथे राहत होते. मात्र अचानक घडलेल्या या दुर्घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याने तलवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या सात वर्षांच्या चिमुरड्याचा वडिलांसह अशा प्रकारे मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये विशेष हळहळ व्यक्त होत आहे. मुलाला वाचविण्यासाठी वडिलांनी केलेला प्रयत्नही त्यांच्या जीवावर बेतला. एकाच दुर्घटनेत बाप-लेकाचा मृत्यू झाल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.

तलावात गाळाचे प्रमाण अधिक असल्याने अशा ठिकाणी पोहण्यासाठी किंवा पाण्यात उतरण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. गाव तलाव परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच लहान मुलांना तलावापासून दूर ठेवण्यासाठी ग्रामस्थांनीही खबरदारी घ्यावी, अशी चर्चा या घटनेनंतर सुरू झाली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण खवशी गाव सुन्न झाले आहे. टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघांचा रेल्वे मार्गावर मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर लगेच खवशी येथील बाप आणि लेक बुडाल्याची ही घटना उघडकीस आली. त्यामुळे अमळनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.