आगीवर नियंत्रण मिळवण्यात गर्दीमुळे अडथळा
काठे गल्ली परिसरातील बनकर चौकाजवळ असलेल्या जय ब्रह्मणी ड्रायफ्रुटस दुकानास सोमवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. दोन्ही गाळे आगीच्या कचाटय़ात सापडले. आगीचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. बघ्यांची गर्दी जमल्याने आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशमन विभागाला कसरत करावी लागली.
काठे गल्ली परिसरात नीलेश ब्रह्मणी व संजू ब्रह्मणी यांच्या मालकीचे जय ब्रह्मणी ड्रायफ्रुट्स व किराणा मालाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रविवारी रात्रीच्या सुमारास दुकान बंद करत ते घरी गेले. पहाटेच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली. दुकानातून धूर येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या मुख्यालयातून दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी दुकानाचे शटर वाकवत आग विझविण्याचे काम केले. आग आटोक्यात आणण्यात तासभर शर्थीने प्रयत्न करावे लागले. तोपर्यंत दुकानातील बहुतांश माल भस्मसात झाला. पाच ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांची गर्दी जमल्याने आग विझविण्याच्या कामात अडथळ्यांचा सामना अग्निशमन पथकाला करावा लागला.