नाशिक: हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) कंपनीच्या सॅप प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ३६ तासांपासून कंपनीची पेट्रोल आणि डिझेल पुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहे. या अडचणीमुळे इंधन पुरवठा करणाऱ्या एचपीसीएलच्या देशभरातील सर्व डेपोमधून पेट्रोल पंपांना पुरवठ्याचे कामकाज ठप्प झाले आहे. परिणामी, अनेक पेट्रोल पंपांवरील इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील एचपीसीएलचे १७० पैकी २० टक्के पंप कोरडे झाले आहेत.
याबाबतची माहिती फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशन अर्थात फामफेडाचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी दिली. राज्यात सुमारे सहा हजार पेट्रोल पंप असून त्यापैकी १७०० पंप एचपीसीएलचे असल्याचा अंदाज आहे. कंपनीचे तज्ज्ञ ही प्रणाली पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. पुरवठा मानवी प्रयत्नांनी सुरळीत करण्याचे काम होत आहे. परंतु, सर्व प्रणाली संलग्न असल्याने त्यात देखील पाहिजे तशी सुधारणा होत नाही. यामध्ये सुधारणा न झाल्यास सर्व स्थिती सुरळीत होण्यास अंदाजे आणखी ४८ तास लागू शकतात, अशी शक्यता गुप्ता यांनी व्यक्त केली.
कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संयम राखावा. इतर पंपांवर गर्दी करू नये. कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई झालेली नाही. केवळ तांत्रिक प्रणालीत दोष निर्माण झाल्याने अडचण निर्माण झाली आहे. सर्व परिस्थिती लवकरच सामान्य होईल, याकडे फामफेडाने लक्ष वेधले, नाशिक जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल मिळून दैनंदिन सुमारे २५ लाख लिटर विक्री होते.
वाहनधारकांनी घाबरून जाऊ नये. ही केवळ तांत्रिक अडचण असून, पेट्रोल अथवा डिझेलची कोणतीही टंचाई नाही. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम यांसारख्या इतर कंपन्यांचे वितरण सुरळीत असून इंधन सहज उपलब्ध आहे. – अमित गुप्ता (अध्यक्ष, फामफेडा)
नाशिक जिल्ह्यात एकूण ५५० पंप असून यापैकी एचपीसीएलचे सुमारे १७० पंप आहेत. बहुतांश पंपावर पुरेसा इंधन साठा आहे. एचपीसीएलचे २० टक्के पंप कोरडे झाले आहेत. उर्वरित पंपांवर इंधन शिल्लक आहे. बीपीसीएल आणि आयओसी कंपनीचा पुरवठा सुरळीत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. – विजय ठाकरे (जिल्हाध्यक्ष, नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशन)