पौरोहित्य करण्यावरून मूळ उपाध्ये आणि परप्रांतीयात वाद

धार्मिकदृष्टय़ा त्र्यंबकेश्वरला लाभलेले अधिष्ठान पाहता अनेकांची पावले वेदपठणासाठी त्र्यंबककडे वळतात.

(संग्रहित छायाचित्र)

उदरनिर्वाह हा कळीचा मुद्दा

धार्मिकदृष्टय़ा त्र्यंबकेश्वरला लाभलेले अधिष्ठान पाहता अनेकांची पावले वेदपठणासाठी त्र्यंबककडे वळतात. शहरातील या वेदशाळांमधून शास्त्रोक्त पद्धतीने वेद शिक्षण घेतलेली मंडळी उदरनिर्वाहासाठी त्र्यंबकमध्येच विसावत असल्याने मूळ उपाध्ये विरुद्ध परप्रांतीय असा वाद सुरू झाला आहे.

बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर शहर परिसरात पौरोहित्य करणारा मोठा घटक आहे. मूळ त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी असलेले उपाध्ये पौरोहित्याची जबाबदारी पेलत असताना या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले गुरुजीही पूजाअर्चा करू लागले.  यामुळे कुशावर्त तीर्थ आणि अन्य ठिकाणी पूजा कोणी करायची, यावरून ‘स्थानिक विरुद्ध बाहेरून आलेले’ असा वाद सुरू आहे. दुसरीकडे, बहुतांश गुरुजींकडे राज्यातील सातारा, सांगली, पुणे, बारामती तसेच अन्य भागांतून वेदविद्या शिकण्यासाठी सहा ते पुढील वयोगटातील विद्यार्थी येतात. काही वर्षांत परप्रांतातून विशेषत गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशातून पौरोहित्य शिकण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सद्यस्थितीत चार वेदपाठशाळा आणि काही पुरोहितांकडे गुरुकुल पद्धतीने वैयक्तिक स्वरूपात वेद पठण करणाऱ्यांची संख्या शंभरपेक्षा अधिक आहे.

यामध्ये बऱ्याचदा यजुर्वेद किंवा ॠग्वेदचा अभ्यास करण्यासाठी साधारणत तीन ते चार वर्षांचा कालावधी लागतो. वेदाचा अभ्यास केल्यानंतर नैमित्तिक पूजेचा अभ्यास काही मंडळी करून पौरोहित्य करण्यास सुरुवात करतात. वेद अभ्यासानंतर पुढच्या सहा वर्षांत संहिता पठण, पदपाठ, क्रमपाठ, जटापाठ आणि घनपाठपर्यंत काही विद्यार्थी शिक्षण पूर्ण करतात. पुरोहितांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांना मिळणारी विशेष वागणूक पाहता वेद शिक्षण घेतलेले विद्यार्थी पौरोहित्य करण्याचा निर्णय घेतात.

त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचा असणारा राबता पाहता गुरुजींकडे शिक्षण घेत असताना झालेल्या ओळखींमुळे काही जण त्र्यंबकमध्येच स्थिरावले आहेत.

विद्यार्थ्यांच्या अशा स्थिरावण्याचा विपरीत परिणाम गुरुजींच्या अर्थार्जनावर होत आहे. परप्रांतीय विद्यार्थी येथेच स्थिरावत असल्याने त्यांची वेगळीच दबंगगिरी येथे सुरू झाली आहे.

यासाठी या मंडळींनी रिक्षाचालक, काही स्थानिक व्यावसायिकांना हाताशी घेत बाहेरगावहून येणारे भाविक, पर्यटकांना पूजेसाठी पळविण्याचे काम सुरू केल्याची तक्रार स्थानिक पुरोहितांकडून होत आहे. यातून दिवसागणिक या ठिकाणी पुरोहितांमध्ये वाद वाढू लागल्याने त्याचा परिणाम त्र्यंबकच्या प्रतिमेवर होत आहे.

दरम्यान, वेदपठण करणारे विद्यार्थी वेद-धार्मिक ग्रंथाचा अभ्यास करीत असून या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ अक्षर ओळख असते. त्यांना वेद अभ्यासाबरोबरच लौकिक शिक्षण मिळावे यासाठी पुरोहित संघ प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाने अनुदान देऊन पुढाकार घ्यावा आणि तशी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्र्यंबक पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी केली आहे.

परप्रांतातून, बाहेरगावहून वेदपठणासाठी आलेले विद्यार्थी हे शिक्षणानंतर मूळ गावी न परतता त्र्यंबकमध्ये स्थिरावत आहेत. सोवळे नेसत त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर उभे राहून पौरोहित्य करीत असल्याचा देखावा परप्रांतियांकडून करण्यात येत येऊन भाविकांची लूट करण्यात येत आहे. या प्रकाराला त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या आखाडय़ातील साधू, महंतांची साथ आहे. या संदर्भात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

– प्रशांत गायधनी (अध्यक्ष, त्र्यंबक पुरोहित संघ)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Due to patriotism original excellence and controversy

ताज्या बातम्या