नाशिक – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन आणि विविध विभागांच्यावतीने २३ जानेवारी रोजी आयोजित सूर्यकिरण ॲरोबॕटिक पथकाच्या एअर शोला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत तब्बल १५ हजार जणांनी ऑनलाईन तिकीटे खरेदी केली आहेत. नाशिकमध्ये हवाई दलाच्या सूर्यकिरण पथकाचा एअर शो पहिल्यांदाच होत आहे. गंगापूर धरण क्षेत्रात ‘हॉक एमके १३२‘ विमानांच्या चित्तथरारक हवाई कसरती होणार आहेत.
जिल्हा प्रशासन, पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावतीने या एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे. एअर शोच्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सोहळ्यासाठी यंत्रणांकडून जय्यत तयारी केली जात आहे. मुख्य सोहळ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे २२ जानेवारीला सूर्यकिरण ॲरोबॕटिक पथक गंगापूर धरण क्षेत्रात रंगीत तालीम करणार आहे. म्हणजे सलग दोन दिवस नाशिककरांना हवाई कसरतींचा आनंद घेता येईल. प्रेक्षकांना या विमानांची तांत्रिक माहिती, वैशिष्ट्ये आणि प्रात्यक्षिकांचे थेट समालोचन ऐकता येईल. या सोहळ्यासाठी ३० ते ४० हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. हवाई कसरतींच्या प्रयोगासाठी ऑनलाईन तिकीटे उपलब्ध करण्यात आली आहेत. १०० रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंत ही तिकीटे आहेत. आतापर्यंत १५ हजार नागरिकांनी ती खरेदी केल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली.
या सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन वेगवेगळ्या नऊ ठिकाणांहून कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला जाईल. गंगापूर धरण परिसरात वाहनतळांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तिथे तीन हजार चारचाकी वाहने थांबू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तिकीटानुसार आसन व्यवस्था अथवा उभे राहून हा शो पाहता येईल. वाहतूक व्यवस्थापन, आपत्कालीन सेवांबाबत विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांसाठी आवश्यक नागरी सुविधा, प्राथमिक आरोग्य सुविधा सज्ज ठेवल्या जाणार आहेत. पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था असेल. या उपक्रमात गंगापूर धरण परिसरातील हॉटेल व रिसॉर्ट चालकांसह शेतकऱ्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन आधीच करण्यात आले आहे. नाशिक येथील गंगापूर धरण परिसरात होणाऱ्या सूर्यकिरण ॲरोबँटिक पथकाच्या एअर शो माध्यमातून नाशिकच्या पर्यटन आणि संरक्षण सामग्री समूह अर्थात डिफेन्स क्लस्टर क्षेत्राला चालना देण्यात येणार आहे.
