साडे तीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या विजया दशमीच्या पाश्र्वभूमीवर, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. समाधानकारक पावसामुळे शहर व ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकांनी खरेदीचा योग साधावा, याकरिता सुवर्ण पेढय़ांसह सदनिका, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती वस्तू, वाहन आदी व्यावसायिकांनी विविध सवलती जाहीर केल्या आहेत.

शेअर बाजार खाली येत असताना सोन्याचे भाव दोन महिन्यात वधारत आहे. या स्थितीत महिनाअखेरीस दसरा आला असला तरी ग्राहकांचा प्रतिसाद मिळण्याची आशा सराफ व्यावसायिक बाळगून आहेत.

नवरात्रोत्सवाच्या अंतिम टप्प्यात उत्साह शिगेला पोहोचला असताना दसऱ्याच्या पूर्वसंध्येला नागरिकांची पूजा साहित्य खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेत एकच गर्दी केली. दसऱ्याला आपटय़ांची पाने आणि झेंडूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पूजाविधी तसेच सजावटीसाठी त्यांची मागणी लक्षणीय वाढते. प्रमुख बाजारपेठांमध्ये पिवळ्या व केशरी रंगातील झेंडूची पखरण झाली. सकाळी मागणी आणि पुरवठय़ात काहीशी तफावत पडेल असे गृहीत धरून  भावाने शेकडय़ासाठी शंभरी ओलांडली. दुपारी विजांच्या कडकडाटासह अकस्मात पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागातून आलेल्या विक्रेत्यांनी तारांबळ उडाली.

बहुतेकांनी रस्त्याच्या कडेला जिथे जागा मिळेल, तिथे फुले विक्री चालवली होती. पावसाने त्यांना फुलांना सुरक्षित स्थळी नेता आले नाही. अनेकांची फुले भिजली. यामुळे कमी भावात त्यांची विक्री करावी लागली. पावसामुळे नाहक नुकसान सहन करावे लागल्याची प्रतिक्रिया विक्रेत्यांनी व्यक्त केली.

सकाळी शंभरी गाठणारा भाव सायंकाळी ६०-७० रुपयांपर्यंत खाली आला. सजावटीसाठी वापरण्यात येणारे शेवंती २०० रुपये प्रती किलो, अ‍ॅस्टर १६०-१८०, गुलाब १८० ते २०० रुपये किलोने विक्री झाली. शहराच्या सभोवतालच्या गंगापूर, शिंदे-पळसे, दिंडोरी तसेच निफाडच्या शेतकऱ्यांनी झेंडूची फुले विक्रीस आणली. त्या फुलांची ६० ते ८० रुपये शेकडा दराने विक्री झाली. आपटय़ाची पाने ५ ते १० रुपये जुडी दराने उपलब्ध होती.

वास्तू, वाहन तसेच सोने खरेदीसाठी दसऱ्याचा मुहूर्त योग्य मानला जात असल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तुंची दुकाने, वाहने आदींची  पूर्व नोंदणी करण्याकडे अनेक ग्राहकांचा कल राहिला. व्यावसायिकांनी वेगवेगळ्या योजना उपलब्ध करत ग्राहकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. कर्ज सुविधा, दसऱ्यानिमित्त खास सवलत, भेट वस्तू, सोडत आदींचा समावेश आहे. घरकूल खरेदीला मिळणारे प्राधान्य लक्षात घेऊन बांधकाम व्यावसायिकांनी अनेक योजना मांडल्या. चौरस फुटाच्या दरात खास सवलत, गृहोपयोगी साहित्याची मोफत उपलब्धता आदी सवलतींचा वर्षांव होत आहे.

या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. बाजारपेठेतील उत्साहात सर्व व्यावसायिक एका बाजूला आणि सराफी व्यावसायिक दुसऱ्या बाजूला राहत असल्याचा अनुभव आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोने ३० हजार १०० रुपये प्रति तोळा तर चांदी ४१ हजार रुपये प्रति किलो दर होता. गत दोन महिन्यात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. दर वाढले तरी सोन्यातील गुंतवणुकीवर अनेकांचा भर असतो. शेअर बाजार घसरत असताना सोन्याचे दर वाढत आहे. सणोत्सवात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभेल, अशी आशा ओढेकर ज्वेलर्सचे संचालक राजेंद्र ओढेकर यांनी व्यक्त केली.

जीएसटी लागू झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या व्यवहारात पारदर्शकता आली आहे. पूर्वी एक तोळे सोने खरेदी करताना ६०० रुपये द्यावा लागणारा कर ९०० रुपयांवर गेला आहे. नोटाबंदी व जीएसटी लागू झाल्यानंतर बाजारपेठेत मंदीचे वातावरण आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला प्रोत्साहन मिळणार मिळण्याची अपेक्षा व्यावसायिक बाळगून आहेत. करवाढ झाल्याने ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी मांडल्या जाणाऱ्या योजनांना काहीअंशी कात्री लागली आहे. मजुरीत काहीशी सवलत, गृहोपयोगी भेटवस्तू अशा नावीन्यपूर्ण योजना मांडल्या आहेत.

येवल्याची वेगळी परंपरा

येवल्यात दसऱ्याची वेगळी परंपरा आहे. श्री बालाजी रथाची मिरवणूक काढली जाते. स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या मैदानावर शमीच्या वृक्षाची पूजा केली जाते. येवलेकर या वृक्षाची पूजा करण्यासह सीमोल्लंघनास येतात. येवल्याचे नगरशेठ पटेल यांच्यासमवेत गुजराथी बांधवही एकाचवेळी सीमोल्लंघनास बाहेर पडतात. सायंकाळी घराघरात सोने देण्यासाठी गर्दी होत असते.

आदिवासी बचाव अभियानतर्फे कार्यक्रम

आदिवासी बचाव अभियान आणि आदिवासी संघटनांच्यावतीने दसऱ्यानिमित्त रावण स्मृती पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पेठरोड शासकीय वसतीगृहापासून शोभायात्रा व रावण ताटी नृत्य करून मिरवणूक काढली जाईल. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे.