एका गरीब कुटुंबातला, मुंबईतल्या माझगावचा तरुण शिवसेनेच्या स्थापनेनंतर  झालेल्या दसरा मेळाव्याला उपस्थित होता. त्या सभेतल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या धारदार आणि ओजस्वी वाणीने तो प्रभावित झाला आणि शिवसैनिक बनला. बाळासाहेबांचा शब्द आज्ञा मानून काम करायचे एवढेच माहीत असलेल्या या तरुणाच्या अंगी असलेले नेतृत्वाचे आणि राजकारणाचे गुण बाळासाहेबांनी हेरले अन् हा तरुण माझगाव ते दादरपर्यंतच्या भागाचा  शाखाप्रमुख झाला. छोट्या जागेत राहून अनेक अडचणींना तोंड देत शिक्षण पूर्ण करीत  पुढे या तरुणाने बृहन्मुंबई  महापालिकेची नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली आणि  इथूनच या तरुणाच्या राजकीय जीवनाची  सुरुवात झाली. तेव्हाचा हा शिवसेनेचा नगरसेवक म्हणजेच आजचे बहुजनांचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ होय.

नगरसेवक बनून राजकीय पटलावर आलेल्या छगन भुजबळ यांची भविष्यातील वाट सहज आणि सोपी नव्हती. या वाटचालीत प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर आणि वळणावर त्यांना अग्निपरीक्षा द्यावी लागली. अग्निपरीक्षेत तावूनसुलाखून निघणे भुजबळांसाठी आजही थांबलेले नाही.

 नगरसेवक, महापौर, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री अशा चढत्या आलेखाबरोबर गरीब आणि इतर मागासवर्गीय समाजातला लोकप्रिय होत चाललेला एक मुत्सद्दी राजकारणी म्हणून भुजबळांना होणारा स्वकीयांचा, परकीयांचा आणि हितशत्रूंचा विरोध वाढत गेला. ‘मला माझी गुणवत्ता सिद्ध करण्याबरोबरच मागासवर्गीयांचे कल्याण करावयाचे असेल तर या सर्व अग्निपरीक्षांमधून जावेच लागणार आहे’, ही खूणगाठ मनाशी बांधलेल्या

भुजबळांनी त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांची आणि होणाऱ्या विरोधाची कधीच तमा बाळगली नाही.

शिवसेनेत असताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात भुजबळांनी पहिली अग्निपरीक्षा दिली. वेश पालटून, नाव बदलून आणि पत्रकार बनून भुजबळ कडेकोट पोलीस बंदोबस्त भेदून गोव्यामार्गे बेळगावात पोहचले आणि आपला हेतू साध्य केला.

बाळासाहेब ठाकरे यांचा निधड्या छातीचा एक आवडता शिलेदार म्हणून भुजबळांनी शिवसेनेत स्वत:चे एक स्थान निर्माण केले होते. अंगी क्षमता, योग्यता आणि धमक असूनही शिवसेनेत जेव्हा त्यांना डावलले जाऊ लागले तसतशी भुजबळांची अस्वस्थता वाढू लागली आणि त्यांनी शिवसेना सोडण्याचा अप्रिय व वेदनादायक ठरणारा निर्णय घेतला. निमित्त होते शिवसेनेने मंडल आयोगाला केलेला विरोध.

आणि इथूनच भुजबळांच्या राजकीय अस्तित्वाला धक्का देणाऱ्या विविध प्रकारच्या अग्निपरीक्षांना सुरुवात झाली. शिवसेना सोडण्याचा भुजबळांनी ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी छगन भुजबळ विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते. ते मंत्रालयासमोरील ‘ए-१०’ मध्ये राहात होते. शिवसेना सोडल्याचा राग मनात धरून काही अपप्रवृतीच्या

लोकांनी भुजबळांवर हल्ला केला. त्यावेळी एका पोलिसाच्या सतर्कतेमुळे भुजबळ या हल्ल्यातून बचावले.

नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना भुजबळ आपल्या काही विश्वासू आणि समविचारी सहकाऱ्यांसमवेत काँग्रेस पक्षात सामील झाले, तेव्हा त्यांना दुसरी अग्निपरीक्षा द्यावी लागली. काँग्रेसमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हाच त्यांना त्या अग्निपरीक्षेची जाणीव झाली होती. त्यामुळे भुजबळ वेश पालटून आणि सतत जागा बदलत ते कडव्या विरोधकांना हूल देत राहिले. जेव्हा ते नागपूर अधिवेशनात विधिमंडळात प्रकट झाले, त्यावेळी प्रचंड हंगामा झाला. याही अग्निपरीक्षेतून भुजबळ तावूनसुलाखून बाहेर पडले. नंतरच्या काळात पुण्यातील महात्मा फुले वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करणे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना अशा अनेक छोट्या-मोठ्या प्रसंगांत भुजबळांच्या कौशल्याचा आणि क्षमतेचा कस लागणाऱ्या अग्निपरीक्षा आल्या पण त्यातूनही ते बाहेर पडले.

भुजबळांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर स्वपक्षातील काहींनी कधी छुपेपणाने, तर अनेकदा उघडपणे भुजबळांबद्दलचा आपला राग आणि आकस व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अविचल निष्ठा असलेले छगन भुजबळ १९९९ साली उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे गृह आणि पर्यटन ही दोन महत्त्वाची खाती सोपविण्यात आली होती. याच दरम्यान शासनाच्या तिजोरीवर परस्पर डल्ला मारणारे बनावट मुद्रांक विक्रीचे तेलगी प्रकरण बाहेर आले.

भुजबळांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली. मात्र, सर्वांनी मिळून या प्रकरणात भुजबळांना लक्ष्य केले. या प्रकरणाशी भुजबळांचा तिळमात्र संबंध नसतानाही या प्रकरणात त्यांना ओढूनताणून गोवण्याचा प्रयत्न त्यांच्या कडव्या विरोधकांनी केला. हे प्रकरण चालू असताच्या दीर्घ कालावधीत स्वत: छगन भुजबळ, त्यांच्या पत्नी मीनाताई, मुलगा पंकज, पुतण्या समीर आणि इतर सर्व कुटुंबीयांना फार मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

भुजबळांच्या दृष्टीने त्यांच्या राजकीय जीवनातील ही सर्वात मोठी आणि त्यांच्या क्षमतेचा कस लावणारी अग्निपरीक्षा होती. या अग्निपरीक्षेतून ते पूर्णपणे तावूनसुलाखून निघाले.

ही अग्निपरीक्षा दिल्यानंतर अगदी अलीकडच्या काळात भुजबळांना आणखी एक अग्निपरीक्षा द्यावी लागली. वास्तविक शासनाच्या तिजोरीवर आर्थिक भार पडू नये म्हणून रस्ते आणि शासकीय इमारती बी.ओ.टी. अर्थात ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’, या तत्त्वावर बांधण्याचा धोरणात्मक निर्णय सेना-भाजप सत्तेत असताना झाला होता. त्यानुसार महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या काळातच या धोरणाची अंमलबजावणी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे च्या निर्मितीच्या माध्यमातून सुरूही झाली होती. राजधानी नवी दिल्लीमध्ये नवे आलिशान महाराष्ट्र सदन बांधण्याची आवश्यकता होती. त्यासाठी दिल्लीत अत्यंत मोक्याच्या ठिकाणची जागाही राज्य शासनाच्या ताब्यात आली होती. मुंबईच्या मलबार हिलवरील ‘हाय माउंट’ हे जुने राज्य अतिथीगृह कमी पडू लागले होते. मुंबईत विशेषत: उपनगरात स्वयंचलित दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला अंधेरी या उपनगरात सुसज्ज अशा मोठ्या इमारतीची गरज होती. ही सर्व कामं राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करून पूर्ण करणं शक्य नव्हते. त्यासाठी भुजबळांनी ही कामे ‘बी.ओ.टी.’ तत्त्वावर पूर्ण करण्याचा प्रस्ताव सादर केला. मुख्यमंत्र्यांसह अनेक पातळ्यांवर, अनेक सचिवांकडून, अनेक वेळा त्याची पूर्ण छाननी   केल्यानंतर तो मान्य करण्यात आला. त्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या सर्व निकषांना उतरल्यानंतर वरील तीन इमारतींची कामे खासगी विकासकाकडे सोपविण्यात आली. या तीन कामांपैकी नवी दिल्ली येथे महाराष्ट्राची शान ठरेल, अशी नव्या महाराष्ट्र सदनाची दिमाखदार इमारत उभी राहिली. ती उभी करताना अनेक अडचणी, अडथळे आणि दिल्लीच्या त्या भागातील कठोर नियमांना तोंड द्यावे लागले.

असे सर्व काही कायदेशीर आणि नियमाला धरून असतानाही या कामाशी सार्वजनिक बांधकाममंत्री या नात्याने भुजबळांचा संबंध असल्यामुळे त्यांच्यावर अलीकडच्या काळात म्हणजे नाशिक लोकसभेसाठी पवारसाहेबांनी छगन भुजबळ यांचं नाव जाहीर केल्यानंतर, त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह आणण्यासाठी तसेच त्यांच्या लोकप्रियतेवर आघात करण्यासाठी त्यांच्यावर निखालस खोटे, बिनबुडाचे आणि निराधार आरोप करणे सुरू झाले. या सर्व आरोपांची भुजबळांनी चिरफाड करून हे सर्व आरोपही फेटाळून लावले.

त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी खासगीकरणातून प्रशस्त रस्ते बांधले. त्यासाठी गुंतवणूक केलेल्या उद्योजकास खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी टोल वसुलीचे त्याला अधिकार देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम म्हणजे रस्ते आणि रस्ते म्हणजे छगन भुजबळ हे समीकरण विरोधकांच्या डोक्यात पक्के बसल्यामुळे टोल नाके आणि टोल वसुलीवरूनही अगदी अलीकडे अनेक वेळा भुजबळांवर टीका करण्यात आली. प्रत्येक वेळी त्यांनी खुलासे देखील केले. मात्र, संबंध नसताना भुजबळांना या अग्निपरीक्षेतून जाणे भाग पाडले.

विकासाची आणि कलासक्त सौंदर्याची दृष्टी असलेल्या छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळताच नाशिकच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहिले आणि लगोलग ते कामाला लागले. नाशिकचा विमानतळ, नाशिक शहरातील भव्य उड्डाणपूल, नाशिक परिसरातील पर्यटन सुविधा, तसेच तीर्थक्षेत्रांचा विकास, शेतीसाठी व पिण्यासाठी जनतेची सरकारशी संबंधित कामे एकाच इमारतीत व्हावीत यासाठी प्रशस्त प्रशासकीय भवनांची निर्मिती, फ्युनिक्युलर ट्रॉलीची महाराष्ट्रात प्रथमच सुविधा इत्यादी अनेक भव्य-दिव्य कामे पूर्णत्वास नेण्याचे त्यांनी ठरवले. मात्र, येवला नाट्यगृह, मुक्तीभूमी, येवला क्रीडा संकुल, येवला तालुका प्रशासकीय संकुल, उपजिल्हा रुग्णालय, येवला न्यायालय इमारत, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आदिवासी वसतिगृह, पैठणी पर्यटन केंद्र, बोट क्लब ही कामे पूर्ण करताना केंद्र व राज्य शासन यांचे तसेच प्रशासकीय अडथळे, जनतेच्या हरकती, विरोधकांच्या टीका अशा अनेक छोट्या-मोठ्या अग्निपरीक्षा भुजबळांना द्याव्या लागल्या. आज नाशिक शहराचे भव्य-दिव्य आणि सुंदर रूपडे पाहायला मिळत आहे, त्याच्यामागे भुजबळांनी दिलेल्या अग्निपरीक्षा आणि त्याग आहे. 

अग्निपरीक्षा देण्याचीच सवय आणि अनुभव असलेले  छगन भुजबळ याही पूर्वीपेक्षा अधिक तावूनसुलाखून निघतील व उपेक्षित आणि इतर मागासवर्गीयांचा शक्तिशाली नेता म्हणून ते राष्ट्रीय पातळीवर उदयास येतील, यात तिळमात्र शंका नाही. ह्याच अभिष्र्टंचतनाच्या निमित्ताने मन:पूर्वक शुभेच्छा.

शब्दांकन- संतोष खैरनार

(प्रदेश प्रसिद्धीप्रमुख,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद)