धुळे : धुळे विभागातून लवकरच ई-बस सेवा सुरू होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. धुळे आगाराच्या आवारातच ई-बससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सार्वजनिक वाहतूक अधिक पर्यावरणपूरक, आधुनिक आणि प्रवाशांसाठी सोयीची करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
धुळे विभागात सध्या नऊ बस डेपो कार्यरत आहेत. अक्कलकुवा आणि साक्री हे दोन डेपो वगळता उर्वरित डेपोमध्ये बससेवेच्या विस्ताराचे नियोजन करण्यात आले आहे. विभागासाठी एकूण २५१ बसेसची मागणी प्रस्तावित करण्यात आली असून, त्यापैकी सध्या १४ बसेस प्रत्यक्ष सेवेत दाखल झाल्या आहेत. उर्वरित बसेसही टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नंदुरबार जिल्ह्यातून धुळे विभागाशी जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवर सध्या नंदुरबार–धुळे, नंदुरबार–संभाजीनगर आणि नंदुरबार–नाशिक या मार्गांवर बससेवा सुरू आहे. या मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत असून, ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरत आहे. प्रवाशांच्या गरजेनुसार ३३ आसनी आणि ४४ आसनी अशा दोन प्रकारच्या बसेस उपलब्ध आहेत. यापैकी ज्या उपलब्ध झाल्या आहेत त्या चालविण्यात येत आहेत. ई-बस सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले चार्जिंग स्टेशन धुळे आगारातील जागेतच उभारले जात आहे. यामुळे भविष्यात ई-बसचे देखभाल, चार्जिंग आणि संचालन अधिक सुलभ होणार आहे. येत्या एका महिन्यात चार्जिंग स्टेशन कार्यान्वित होण्याची शक्यता असून, त्यानंतर ई-बस सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
ई-बस सेवा सुरू झाल्यास इंधन खर्चात बचत, प्रदूषणात घट आणि प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. धुळे, नवापूर, दोंडाईचा, शिंदखेडा, शिरपूर, शहादा आणि नंदुरबार या भागांतील प्रवाशांना या सेवेचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे. विभागीय वाहतूक अधिकारी व विभाग नियंत्रक सौरभ देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-बस सेवा सुरू करण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असून, आवश्यक त्या सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी पुढील काळात आणखी बसेस उपलब्ध करून देण्याचाही मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सद्या नंदुरबार आगारातून छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नाशिक अशी बस सेवा सुरु आहे. भविष्यात बसेस उपलब्ध झाल्यावर जिल्ह्यातील प्रवाशांना धुळे आगारासह जिल्ह्यातील अन्य भागातूनही ई बससेवेचा लाभ घेता येऊ शकेल.
दरम्यान, ई-बस सेवा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर चालक व वाहकांच्या प्रशिक्षणावरही भर द्यावा लागणार आहे. नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत पद्धतीने सेवा देण्यासाठी कर्मचारी सज्ज करण्यात येणार असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसह वेळापत्रक शिस्तबद्ध ठेवण्याचे नियोजनही करावे लागणार आहे. ई-बस सेवेच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीकडे नागरिकांचा ओढा वाढावा, हा प्रशासनाचा उद्देश आहे. ही सेवा यशस्वी ठरल्यास भविष्यात धुळे विभागात आणखी मार्गांवर ई-बस सुरू होऊ शकतील.

