नाशिक – नाशिक जिल्ह्यास महिनाभरापासून भूकंपाचे हलके धक्के बसत आहेत. प्रामुख्याने पेठ, दिंडोरी, सुरगाणा आणि कळवण या तालुक्यांमध्ये हे धक्के सातत्याने जाणवत आहेत. भूकंपांच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीती आहे. भूकंपांच्या धक्क्यांची तीव्रता वाढल्यास काय करावे, आपले प्राण कसे वाचवावेत, असे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. पेठ आणि दिंडोरी तालुक्यात भूकंपाच्या घटना सतत घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पुणे यांच्या सहकार्याने विशेष प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यातून भूकंपासारख्या आपत्तीत कोणती काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

पेठ तालुक्यातील इनामबारी येथे एनडीआरएफच्या पथकाने भूकंपाच्या काळात घ्यावयाची काळजी, सुरक्षितस्थळी जाण्याच्या पद्धती तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी पथकाकडून विविध आपत्तीजन्य परिस्थितींमध्ये बचावकार्य कसे करावे, याची प्रात्यक्षिकेही करून दाखविण्यात आली. यावेळी पेठचे तहसीलदार शिवाजी गवळी व कार्यालयातील कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

तसेच, दिंडोरी तहसील कार्यालय येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात भूकंप, आग, पूर तसेच अन्य नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी आणि कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत एनडीआरएफ पथकाने सविस्तर माहिती दिली. आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या वेळी शांतता राखणे, सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे आणि आपत्तीनंतर बचाव व मदतकार्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करणे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी दिंडोरीचे तहसीलदार मुकेश कांबळे, निवासी नायब तहसीलदार डॉ. चैताली दराडे, मंडळ अधिकारी तलाठी आणि कार्यालयातील इतर कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची तीव्रता कमी करता येत नसली, तरी पूर्वतयारी, योग्य प्रशिक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून संभाव्य जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते, या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात आले. पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे तसेच आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे.