​मालेगाव : भारतीय संस्कृतीमध्ये होळी हा सण वाईट प्रवृत्तींचा नाश आणि सत्प्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. मात्र, अलीकडच्या काळात होळीसाठी होणारी वृक्षतोड हा चिंतेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, देवळा तालुक्यातील उमराणे येथील जाणता राजा मित्रमंडळातर्फे सामाजिक बांधिलकी जपत गेली २० वर्षे राबविण्यात येणारा पर्यावरणपूरक होळी उत्सव अनोखा आणि समाजापुढे आदर्श निर्माण करणारा ठरत आहे.

गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेला हा स्तुत्य उपक्रम यंदाही मंडळातर्फे राबविण्यात आला. ​मराठी वर्षाचा शेवटचा सण असलेल्या फाल्गुन पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. या दिवशी होळी पेटवण्यासाठी लाकडांचा वापर केला जातो. तेव्हा वृक्षतोडीला आळा बसावा आणि पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, यासाठी जाणता राजा मित्रमंडळाने सन २००७ पासून एक व्रत हाती घेतले आहे. होळीसाठी जिवंत झाडांची कत्तल होऊ नये, या उदात्त हेतूने हे मंडळ दरवर्षी स्वखर्चाने वाळलेल्या झाडांची मुळे तसेच खोडे जमा करते. तसेच होळी पेटवण्यासाठी ते लोकांना मोफत उपलब्ध करून देते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यंदाही जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने मृत वृक्षांची लाकडे जमा करून ती ग्रामदैवत श्री रामेश्वर महादेव मंदिरासमोर पोहोच केली. त्यानंतर जमा झालेली ही लाकडे लोकांनी होळी पेटवण्यासाठी वापरली.

वटवृक्षांची लागवड

​मंडळाचा हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून, उमराणे परिसरात वटवृक्षांची देखील दरवर्षी लागवड केली जाते. विशेष म्हणजे, केवळ झाडे लावून मंडळाचे कार्यकर्ते थांबत नाहीत, तर या झाडांचे जतन आणि नियमित देखभाल करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे सद्यःस्थितीत उमराणे परिसरात अनेक वटवृक्ष दिमाखात उभे असल्याचे दिसत आहे.

​माणसातील द्वेष आणि वाईट प्रवृत्तींचे दहन करणे हा होळीचा खरा अर्थ आहे. निसर्ग आपल्याला जीवन देतो, मग सणासाठी त्याची कत्तल का करायची? हाच विचार घेऊन आम्ही ही परंपरा सुरू ठेवल्याचे मंडळाचे संस्थापक नंदन देवरे यांनी सांगितले. मंडळाने राबविलेल्या या ‘पर्यावरणपूरक होळी’ उपक्रमाचे ग्रामस्थांसह परिसरातील निसर्गप्रेमी आणि सर्व स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे. आजच्या काळात जेव्हा ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे संकट गडद होत आहे, तेव्हा उमराण्यासारख्या ग्रामीण भागातून दिला जाणारा हा संदेश नक्कीच प्रेरणादायी आहे.