नौकानयन खेळाडू दत्तू भोकनळवर अमेरिकेत आर्थिक आपत्ती

नौकानयन क्रीडा प्रकारात रिओ ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या आणि त्या अनुषंगाने अमेरिकेत पूर्व प्रशिक्षणासाठी गेलेल्या दत्तू भोकनळ या नाशिक जिल्ह्य़ातील खेळाडूला अखेरच्या क्षणी महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत देणे नाकारल्यामुळे त्याच्यावर परदेशात हॉटेल सोडून एका गुजराती कुटुंबाच्या घरात आश्रय घ्यावा लागला आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दत्तू भोकनळ याला प्रशिक्षण गरजेचे होते. त्यासाठी दत्तूने लष्करासमोर परदेशात प्रशिक्षण घेण्याचा प्रस्ताव ठेवला. लष्कराने त्यास मान्यता देऊन आपल्या धोरणानुसार आर्थिक मदतीची तयारी दर्शविली. अमेरिकेतील मियामी येथे त्यास प्रशिक्षण देण्याचे निश्चित झाले. लष्कराने त्याचा विमान प्रवास आणि प्रशिक्षण खर्चातील काही बाबींची पूर्तता केली. चांगला सराव करण्यासाठी लागणारे साहित्य आणि शारीरिक तंदुरुस्ती टिकविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, निवास खर्च, वैयक्तिक प्रशिक्षक अशा काही बाबींचा भार त्यास वैयक्तिक स्वरुपात उचलावा लागणार होता. ही बाब लक्षात घेऊन दत्तूने दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाकडे आर्थिक मदतीसाठी अर्ज केला. राज्य शासनाकडून पाच लाख रुपयांची मदत मिळेल या आशेवर दत्तू २१ जूनला अमेरिकेला रवाना झाला. स्थानिक पातळीवर नातेवाईकांकडून मदतीसंबंधी पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर पाठपुरावाही करण्यात आला. प्रारंभी त्यावर ‘कार्यवाही झाली आहे’ असे उत्तर आले. त्यामुळे नातेवाईकांनी नेमकी काय कार्यवाही झाली याची विचारणा केली असता आर्थिक मदत देण्यात येऊ नये, असा निर्णय शासनाने घेतल्याचे सांगण्यात आले.
ऑलिम्पिक प्रवास
दत्तू भोकनळ चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील आहे. लहानपणापासून विहिरींचे खोदकाम करणाऱ्या दत्तुची भारतीय लष्करात हवालदार पदावर निवड झाली. विहिरीच्या खोदकामामुळे त्याची शरीरयष्टी मजबूत होती. त्याकडे पाहून लष्करी प्रशिक्षकांनी त्यास नौकानयन क्रीडा प्रकारात उतरविले, पाहता पाहता त्याने राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदक आणि अशियाई स्पर्धेत रौप्य पदक मिळविले.