नाशिक – इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आल्याने पारदर्शकता येईल. संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या हितासाठी आभासी पध्दतीने राबवली जात आहे. कोणालाही प्रवेश नाकारता येणार नाही. पारदर्शकतेसाठी हे महत्वाचे पाऊल आहे, अशी भूमिका शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मांडली.
येथे पत्रकारांशी संवाद साधताना भुसे यांनी अपार घोटाळ्यासंदर्भात चौकशी प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. तांत्रिक कारणास्तव चौकशी थांबली होती. दोषींविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. मालेगाव येथील अंधशाळेप्रमाणेच शैक्षणिक अनुदान वेगवेगळ्या पध्दतीने राज्यातील काही ठिकाणी लाटण्यात आले आहे. त्याविषयी चौकशी करून कारवाई केली जाईल. खोटी स्वाक्षरी,बनावट शालार्थ सांकेतांक दाखवून असे करण्यात आले आहे. अशा प्रकरणात अधिकाऱ्यांचा सहभाग असल्यास त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा भुसे यांनी दिला