नाशिक : देशातील १० स्वच्छ शहरांच्या यादीत स्थान पटकविण्याची संधी साधण्यासाठी नाशिकच्या हाती केवळ तीन दिवस उरले असून त्यासाठी सुरू असलेल्या आभासी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी करून घेण्यासाठी विविध शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक औद्योगिक, व्यापारी व व्यावसायिक संघटनानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नाशिक सिटीझन्स फोरमने केले आहे.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे देशातील शहरांना स्वच्छतेबाबतच्या विविध पैलूंचे अवलोकन करून मानांकन दिले जाते. शहरातील सार्वजनिक स्वच्छता, शहरील कचरा संकलन आणि त्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट, जैव वैद्यकीय कचरा संकलन, मलनिस्सारण व्यवस्था, सार्वजनिक शौचालयांची स्थिती, हागणदारी मुक्ती अशा विविध मुद्यांवर आधारीत हे मानांकन ठरविले जाते. त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी, सेवा पातळी प्रगती, प्रमाणपत्र सादरीकरण यांच्याइतकाचा महत्त्वाचा ठरतो तो नागरिकांचा प्रतिसाद. इतर अनेक मुद्दय़ांमध्ये सरस असूनही सिटीझन प्रतिसादाच्या कमरतेमुळे नाशिकची पिछेहाट होत असल्याचा अनुभव आहे. २०१६ पासून सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रारंभी नाशिक बरेच मागे होते. पण २०२० साली नाशिकने ६७ व्या स्थानावरून थेट ११ व्या स्थानावर झेप घेतली. त्यावेळी अवघ्या एका क्रमांकावरून नाशिकचा पहिल्या १० स्वच्छ शहरांमध्ये समावेश हुकला होता. मात्र, २०२१ साली नाशिक पुन्हा १७ व्या स्थानावर घसरले. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत नाशिकला पुन्हा पुढे आणण्याची संधी आभासी प्रतिसाद अर्ज भरून नाशिककरांना भरून काढता येणार आहे, त्यासाठी नाशिक सिटीझन्स फोरमने विविध पातळय़ांवर जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
आभासी अर्ज
हा आभासी अर्ज https:// ss- cf. sbmurban. org/#/ feedback ‘ या लिंकवर जाऊन भरण्यासाठी अवघ्या दोन मिनिटांचा वेळ पुरेसा आहे. या लिंकवर क्लिक केल्यास आधी राज्य, जिल्हा, शहर आणि आपल्या परिसराचे नाव भरावे लागते. त्यानंतर वय, शहराचे रहिवासी असल्याचा होय असे उत्तर, नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, लिंग हे तपशील भरल्यास भ्रमणध्वनीवर ओटीपी येतो. तो टाकून हा अर्ज लगेच दाखल करता येतो.
बहुतांश शहरांच्या तुलनेत नाशिक हे खरोखरच सुंदर आणि स्वच्छ शहर आहे. नाशिकच्या घनकचरा संकलन आणि विल्हेवाट प्रकल्पाचा अभ्यास करून त्यात स्वत:च्या संकल्पनांची भर घालणारे इंदूर देशात सर्वाधिक स्वच्छ शहर असल्याचा बहुमान पटकावते. इतरही अनेक शहरांनी नाशिकच्या घंटागाडी व्यवस्थेचे अनुकरण केले आहे. स्वत: नाशिककरही शहर स्वच्छ राखण्याबाबत स्वयंप्रेरणेने जबाबदारी पार पाडत असतात. असे असताना केवळ तांत्रिक बाबींमध्ये कमतरता राहिल्याने स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिकची पिछेहाट होणे पटणारे नाही. म्हणूनच यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात किमान एक लाख नागरिकांनी सहभागी होणे गरजेचे आहे. यासाठी नाशिक सिटीझन्स फोरम प्रयत्नशील आहे. – हेमंत राठी (अध्यक्ष, नाशिक सिटीझन्स फोरम)