जळगाव : अपात्र असतानाही दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेल्या शासकीय नोकरीवर रूजू झालेल्या जिल्हा परिषदेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या आदेशावरून आणखीही बरेच जण शासनाची फसवणूक केल्याने कारवाईच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या निर्देशानुसार दिव्यांग कर्मचाऱ्यांचे युआयडी कार्ड व प्रमाणपत्रांची गेल्या काही दिवसांपासून सखोल पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश दिव्यांगत्वाच्या सवलती, शासकीय लाभ व आरक्षणाचा लाभ केवळ पात्र आणि खऱ्या गरजू व्यक्तींनाच मिळावा, हा आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील दिव्यांग कर्मचाऱ्यांची कडक तपासणी करण्यात येत असून, जळगाव जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही काही दिवसांपासून तपासणी सुरू आहे. या तपासणीअंतर्गत संबंधित कर्मचाऱ्यांची कागदपत्रे, दिव्यांग प्रमाणपत्रांवरील नोंदी, युआयडी कार्डमधील माहिती तसेच प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणी अहवाल यांची तुलना करण्यात येत आहे. तपासणीदरम्यान काही कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांमध्ये नमूद असलेली दिव्यांगत्वाची टक्केवारी आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष तपासणीत नोंदविण्यात आलेले निष्कर्ष यामध्ये लक्षणीय तफावत आढळून आली आहे.
निलंबनासह विभागीय चौकशी ?
काही प्रकरणांत प्रमाणपत्रांवर दर्शविण्यात आलेली टक्केवारी प्रत्यक्ष तपासणीच्या निकषांशी जुळत नसल्याचे देखील दिसून आले आहे. या गंभीर बाबीची दखल घेत शासनाच्या नियमावली व मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. नियमांनुसार अशा स्वरूपाच्या तफावती आढळल्यास प्राथमिक स्वरूपात निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली जाते, त्यानंतर सविस्तर चौकशी करून पुढील निर्णय घेतला जातो. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनासह विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा शासनाचा उद्देश आहे. मात्र खोट्या अथवा चुकीच्या प्रमाणपत्रांच्या आधारे सवलतींचा लाभ घेतला जात असल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. आगामी काळात तपासणी मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार असून, आणखी कर्मचाऱ्यांची दिव्यांग तपासणी केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
यांच्यावर निलंबनाची कारवाई
तपासणी मोहिमेदरम्यान दिव्यांग टक्केवारीत तफावत आढळून आलेल्या एकूण आठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये चाळीसगाव पंचायत समिती अंतर्गत कार्यरत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी नारायण मोरे, बोदवड पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागात कार्यरत वरिष्ठ सहाय्यक शंकर वाघमारे, पाचोरा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत वरिष्ठ सहाय्यक लेखा विक्रम पाटील तसेच धरणगाव पंचायत समिती अंतर्गत कार्यरत कनिष्ठ सहाय्यक लेखा संतोष पाटील तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील आरोग्य सहाय्यक भालचंद्र पवार, वाघोड (ता. रावेर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यिका छाया भोळे, तरवाडे (ता. चाळीसगाव) येथील आरोग्य सेवक संदीप सोनवणे आणि पिंपरखेड (ता. भडगाव) येथील आरोग्य सहाय्यक गणेश महाजन यांचा समावेश आहे.
