scorecardresearch

जळगाव : उद्योजकाकडून खंडणी मागणाऱ्या कथित पत्रकारासह आठ जण पोलिसांच्या सापळ्यात

ऑइल मिलमध्ये महिलेसह पुरुषाने तुमच्या ऑइल मिलबाबत शासकीय कार्यालयाकडे तक्रार करण्यात येईल, अशी धमकी देत आठ लाखांची खंडणी मागितली. 

जळगाव : उद्योजकाकडून खंडणी मागणाऱ्या कथित पत्रकारासह आठ जण पोलिसांच्या सापळ्यात
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

जळगाव : एरंडोल येथील म्हसावद रस्त्यावरील बालाजी ऑइल मिलचे संचालक अनिल काबरे यांना वारंवार धमकी देत आठ लाखांची खंडणी मागणी करणार्‍या एका इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या पत्रकारासह आठ जणांना पोलिसांनी सापळा रचत अटक केली. संशयितांमध्ये पाच युवक, महिला, दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. पोलिसांची चाहूल लागताच महिलेसह तिघांनी दुचाकींवरून जळगावकडे पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करीत त्यांना पकडत ताब्यात घेतले.

एरंडोल येथील म्हसावद रस्त्यावर अनिल काबरे यांची बालाजी ऑइल मिल आहे. ऑइल मिलमध्ये महिलेसह पुरुषाने तुमच्या ऑइल मिलबाबत शासकीय कार्यालयाकडे तक्रार करण्यात येईल, अशी धमकी देत आठ लाखांची खंडणी मागितली. उद्योजक काबरे यांनी खंडणीची धमकी आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी संशयित खंडणी घेण्यासाठी येत असल्याचेही उद्योजक काबरे यांनी पोलिसांना सांगितले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांनी बालाजी ऑइल मिलमध्ये सापळा रचला. त्यावेळी दोन महिलांसह अन्य दोन संशयित मिलमध्ये आले, तर एक महिला व तीन संशयित मिलबाहेर थांबून होते.

हेही वाचा >>> VIDEO : “ए, गई बोला ना…काय पो छो..” म्हणत येवल्यातील पतंगबाजीचा आतषबाजीने समारोप

मिलमध्ये आलेल्या संशयितांपैकी एका महिलेने संचालक काबरे यांच्याकडून एक लाख रुपये स्वीकारताना पोलीस पथकाने ताब्यात घेतले. तेथे असलेले तिचे साथीदारही पोलिसांच्या जाळ्यात अडकले. मिलमध्ये आपले साथीदार पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची चाहूल लागताच मिलबाहेर थांबून असलेल्या महिलेसह तिघांनी दोन दुचाकींवरून जळगावकडे पळ काढला. मात्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, हवालदार जुबेर खाटिक, महिला पोलीस ममता तडवी, गृहरक्षक दलाचे जवान दिनेश पाटील यांनी त्यांचा सिनेस्टाइल पाठलाग करीत महामार्ग पोलीस व पाळधी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांच्या सहकार्याने त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयितांकडून एक लाख रुपये रोख, मोटार, भ्रमणध्वनीचे आठ संच, दोन दुचाकी, असा सुमारे दहा लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा >>> नाशिक : दिंड्यांनी गजबजली त्र्यंबक नगरी- संत निवृत्तीनाथ यात्रोत्सवासाठी वारकऱ्यांची गर्दी

खंडणीखोरांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली. त्यांनी त्यांची नावे  शशिकांत सोनवणे (रा.द्वारकानगर, भुसावळ), सिद्धार्थ  सोनवणे (रा. ताप्ती क्लब, भुसावळ), रूपाली  तायडे (रा.धम्मनगर, भुसावळ), आकाश  बोदडे (रा. तळणी, ता. मोताळा), मिलिंद  बोदडे (पत्रकार, न्यूज २४; तळणी, ता. मोताळा, जि. बुलडाणा), गजानन बोदडे (रा. धम्मनगर, भुसावळ) अशी असल्याचे सांगितले. दरम्यान, कथित पत्रकार मिलिंद बोदडे यांनी यापूर्वीही विविध शासकीय कार्यालयांत वेगवेगळ्या नावांनी बालाजी ऑइल मिलविरोधात तक्रारी करून काबरे यांच्याकडून ६० ते ७० हजार रुपये खंडणी उकळली आहे.

दरम्यान, दोन अल्पवयीन संशयितांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या सहकार्याने सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 10:40 IST

संबंधित बातम्या