जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ३० ऑगस्ट रोजी कोथळी (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांतील दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. आता कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाच समोर आली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याने या कार्यक्रमाला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
एकनाथ खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे पत्रिकेत नमूद आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय सावकारे, छगन भुजबळ, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल तसेच खासदार सुप्रिया सुळे आदी नेत्यांची नावेही निमंत्रण पत्रिकेत आहेत. त्यामुळे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील विविध राजकीय प्रवाहांतील नेते एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.
फडणवीस–खडसे भेटीकडे लक्ष
या कार्यक्रमातील सर्वाधिक चर्चेचा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संभाव्य उपस्थिती ठरणार आहे. भाजपमध्ये असताना एकनाथ खडसे हे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. मात्र, पक्षातून बाहेर पडल्यानंतर खडसे आणि भाजप नेतृत्वातील राजकीय संबंधांमध्ये अनेकदा तणावाचे चित्र दिसून आले आहे. विशेषतः खडसे आणि फडणवीस यांच्यातील राजकीय मतभेद वेळोवेळी चर्चेत राहिले आहेत. त्यामुळे ३० ऑगस्ट रोजी कोथळी येथे होणाऱ्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमातील फडणवीसांच्या उपस्थितीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकाच व्यासपीठावर विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमातून कोणते राजकीय संकेत मिळतात, याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.
महाजनांच्या उपस्थितीबाबत उत्सुकता
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे नावही कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतील प्रमुख अतिथींमध्ये असल्याचे दिसून येत आहे. खडसे आणि महाजन यांच्यातील राजकीय संघर्ष जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र, महाजन यांनी यापूर्वीच पत्रकारांशी बोलताना काही कारणास्तव आपण खडसे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे निमंत्रण पत्रिकेत नाव असतानाही महाजन प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता आहे. एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. राज्याच्या राजकारणात मंत्री, विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांनी दीर्घकाळ भूमिका बजावली. त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या राजकीय आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे.
