जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरातील अमृत महोत्सवी सोहळ्याला महायुतीतील प्रमुख नेते, मंत्री आणि आमदारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. या सोहळ्याला खडसेंचे जुने राजकीय सहकारी मंत्री गिरीश महाजनही उपस्थित नव्हते. त्याचे कारण पत्रकारांनी विचारले असता, महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी उलट एकनाथ खडसे यांना आपल्या नेहमीच्या शैलीत खोचक टोला हाणण्याची आणखी एक संधी साधली.

एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे, गिरीश महाजन यांच्यासह राज्यातील अनेक मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मुक्ताईनगर येथे आयोजित या सोहळ्याला महायुतीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात महायुतीतील मंत्री आणि आमदारांची मोठ्या प्रमाणावर अनुपस्थिती दिसून आली.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि प्रतापराव जाधव यांचा अपवाद वगळता महायुतीतील प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली. त्यामुळे खडसेंच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमातील राजकीय उपस्थिती आणि अनुपस्थितीची चर्चा जळगावच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महाजनांना पत्रकारांचा सवाल

गिरीश महाजन हे एकनाथ खडसे यांचे जुने राजकीय सहकारी राहिले आहेत. दोघांमधील राजकीय संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे महाजन यांनी खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला उपस्थिती न लावल्याबाबत पत्रकारांनी त्यांना थेट प्रश्न विचारला. यावर महाजन यांनी, ‘एकनाथ खडसे यांना शुभेच्छा देण्याइतका मी मोठा माणूस नाही,’ असे सांगत खोचक टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा खडसे-महाजन यांच्यातील राजकीय संबंध चर्चेत आले आहेत. एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुस्तकातील छायाचित्रांच्या संदर्भातही महाजन यांनी भाष्य केले. पुस्तकात आपला फोटो छापण्यात आला असल्यास त्यामागे कौटुंबिक संबंध कारणीभूत असतील, असे सांगत त्यांनी त्यावरही उपरोधिक टिप्पणी केली. त्यामुळे महाजन यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

रक्षा खडसेंच्या वक्तव्यावरही टिप्पणी

दरम्यान, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी अमृत महोत्सवी सोहळ्यानंतर ‘जे आले त्यांचे आभार आणि जे आले नाहीत त्यांचेही आभार,’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. रक्षा खडसे यांच्या या वक्तव्याचा संदर्भ घेत गिरीश महाजन यांनीही खोचक टिप्पणी केली. ‘रक्षा खडसे यांचेही आभार,’ असे म्हणत महाजन यांनी त्यांच्या वक्तव्यावर मिश्कील भाष्य केले. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या सोहळ्याला महायुतीतील नेत्यांची अनुपस्थिती आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चेला आणखी धार आली आहे. एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे एका बाजूला महायुतीतील प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती, असे राजकीय चित्र या कार्यक्रमात पाहायला मिळाले.